
पाटण्यात एका कोचिंग क्लासला आग लागली व 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्याआधी ‘नीट’ परीक्षेत झालेल्या पेपरफुटीने देशभरातील हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा खेळखंडोबा झाला. आता महाराष्ट्रात ‘टीईटी’ पेपरफुटीत हजारो तरुणांचे भविष्य जळून खाक झाले. त्याचे प्रायश्चित्त कोणी घ्यायचे? महाराष्ट्राची संपूर्ण शिक्षण व्यवस्था सडली आहे. इतके भयंकर गुन्हे घडूनही शिक्षा कुणालाच होत नाही. त्यामुळे राजरोस पेपर फोडण्याचा धंदा सुरू आहे. बिहार, उत्तर प्रदेशसारखी राज्ये सामुदायिक कॉपी, सरकार पुरस्कृत कॉपीसाठी बदनाम होती. महाराष्ट्राने तर एक पाऊल पुढेच टाकले. सरकार पुरस्कृत ‘पेपर लीक’ असा हा नवा धंदा जोरात सुरू आहे. राममंदिराच्या दानपेट्या लुटणाऱ्यांकडून दुसरी काय अपेक्षा करणार!
देशात शिक्षणाचा, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा जो खेळखंडोबा सध्या सुरू आहे त्याचे मुख्य केंद्र महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असून त्यांच्या दृष्टीने हा खेळखंडोबा म्हणजे किरकोळ बाब आहे. गेल्या महिन्यात झालेल्या ‘नीट’ पेपरफुटीचे केंद्र महाराष्ट्रातच निघाले होते आणि आता ‘टीईटी’चा पेपर फुटला. महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेचे हे धिंडवडे आहेत. राज्यातील लाखो युवक-युवतींनी शिक्षकी पेशा स्वीकारण्यासाठी ‘टीईटी’ परीक्षेची तयारी केली होती. 28 जून रोजी परीक्षा होती. त्याच्या एक दिवस आधी पेपर फुटल्याने परीक्षा रद्द झाली. पेपर ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे फुटला. ही फक्त एक सामान्य घटना नाही, तर सत्ताधारी महायुती सरकारच्या अपयशाची, भ्रष्टाचाराची, त्यातून निर्माण झालेल्या राक्षसी चक्रव्यूहाची तसेच युवा पिढीच्या भविष्याशी केलेल्या द्रोहाची काळी कहाणी आहे. महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला काळे फासणारी ही प्रकरणे वारंवार घडत आहेत. ज्या महाराष्ट्राने देशात शिक्षणाचा, समाज सुधारणेचा पाया रचला तो महाराष्ट्र रोज खाली घसरताना पाहावा लागत आहे. पुरोगामी महाराष्ट्राचा जणू खूनच सुरू आहे. ‘पेपर फुटणे’ हे आता आमदार, खासदार फुटण्यासारखे नॉर्मल झाले आहे. फुटणाऱ्या खासदार, आमदारांना पन्नास-पन्नास कोटी मिळतात, पण पेपरफुटीने लाखो युवांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांना एक दिवसही त्यांच्या पदावर राहण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून अपयशी ठरले आहेत. राजकीय फायद्यासाठी व भाजपला लाभ पोहोचावा म्हणून गृह खाते राबवले जात आहे. महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्र्याची गरज आहे. देवेंद्र फडणवीस यांना गृह खात्यास न्याय देता येत नसेल तर त्यांनी हे खाते स्वतःहून सोडायला हवे;
पण इतकी नैतिकता
महाराष्ट्राच्या सत्ताधाऱ्यांमध्ये शिल्लक राहिली आहे काय? फुटलेल्या आमदार, खासदारांसाठी अर्धे पोलीस बळ राबवले जात आहे. पेपरच्या सुरक्षेपेक्षा गृहमंत्र्यांना गद्दारांची सुरक्षा महत्त्वाची वाटते. कारण या मंडळींनी विद्यार्थ्यांना इतके लाचार व हतबल बनवले आहे की, ते चिडून चिडून तरी काय करणार? त्यांना झुरळे ठरवून चिरडले जाईल. त्यामुळे ‘टीईटी’ परीक्षेचे पेपर फुटले व परीक्षाच रद्द झाली तरी उसासे सोडण्याशिवाय हे परीक्षार्थी काहीच करू शकत नाहीत. ‘टीईटी’ ही फक्त एक परीक्षा नाही, तर उत्तम शिक्षक होण्याची ही पहिली पायरी आहे. मात्र भविष्यातील पिढी घडवणाऱ्या शिक्षकांच्या निवड प्रक्रियेतच घोटाळा, गडबड सुरू आहे. महाराष्ट्राचे भविष्य किती भयंकर माफियांच्या हाती गेले आहे, त्याचा हा धक्कादायक पुरावा आहे. पेपर लीक माफिया, त्याचे सर्व दलाल, भ्रष्ट अधिकारी असे हे रॅकेट आहे. त्या रॅकेटला सत्ताधाऱ्यांचे भक्कम पाठबळ असल्याशिवाय ‘पेपर’ फुटणार नाहीत. ‘नीट’चे पेपर फोडणारी साखळी भाजपशी संबंधित आहे. ‘टीईटी’चा पेपर फोडणारेही याच सकल भाजप परिषदेचे सदस्य आहेत. परीक्षेच्या चोवीस तास आधी समाज माध्यमांवर फुटलेले पेपर फिरतात आणि सरकार फक्त ‘तपास’ करण्याच्या नावाखाली वेळ काढते. ‘नीट’ प्रकरणातील गँग पुणे, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नाशिक येथे सक्रिय होती. ‘टीईटी’ प्रकरणात भिवंडीचे नाव आहे. वारंवार पेपरफुटीची प्रकरणे महाराष्ट्रातच का घडत आहेत, याचे उत्तर गृहमंत्री फडणवीस देऊ शकतील काय? शिक्षण खाते हे राजकीय घुसखोर व एका विचारसरणीच्या बदमाशांचा अड्डा झाला आहे. आपल्याच विचाराच्या लोकांना शिक्षण क्षेत्रात घुसवता यावे यासाठी सरळ पेपर फोडून त्यांचे कल्याण केले जात आहे हे काय गृहमंत्री फडणवीस यांना माहीत नाही? परीक्षा आयोजित करणाऱ्या प्रत्येक यंत्रणेवर
भाजपचा व संघाचा कब्जा
आहे. सर्व कुलगुरू, परीक्षा नियंत्रक, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भाजपने नेमले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील पेपरफुटीची जबाबदारी भाजपने घ्यायला हवी. सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे व आमदारांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सुरू असलेल्या खेळखंडोबा प्रकारावर सभागृहाचे कामकाज रोखले पाहिजे. राहुल गांधी यांनी पेपर लीक प्रकरणात केलेले भाष्य अत्यंत महत्त्वाचे आहे. ते म्हणतात, “Another paper leak, another exam cancelled. This is theft of the youth’s future.” म्हणजे हे केवळ पेपर फुटणे नाही, तर युवकांची स्वप्ने, आशा-आकांक्षांची चोरी करण्याचे षडयंत्र आहे. पाटण्यात एका कोचिंग क्लासला आग लागली व 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्याआधी ‘नीट’ परीक्षेत झालेल्या पेपरफुटीने देशभरातील हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा खेळखंडोबा झाला. आता महाराष्ट्रात ‘टीईटी’ पेपरफुटीत हजारो तरुणांचे भविष्य जळून खाक झाले. त्याचे प्रायश्चित्त कोणी घ्यायचे? पंतप्रधान मोदी युवकांना नवीन स्वप्ने दाखवतात व परदेशात फिरायला जातात. त्यांना युवकांचे भविष्य घडवण्यापेक्षा आमदार, खासदार फोडण्यातच जास्त रस आहे. महाराष्ट्राची संपूर्ण शिक्षण व्यवस्था सडली आहे. इतके भयंकर गुन्हे घडूनही शिक्षा कुणालाच होत नाही. त्यामुळे राजरोस पेपर फोडण्याचा धंदा सुरू आहे. बिहार, उत्तर प्रदेशसारखी राज्ये सामुदायिक कॉपी, सरकार पुरस्कृत कॉपीसाठी बदनाम होती. महाराष्ट्राने तर एक पाऊल पुढेच टाकले. सरकार पुरस्कृत ‘पेपर लीक’ असा हा नवा धंदा जोरात सुरू आहे. राममंदिराच्या दानपेट्या लुटणाऱ्यांकडून दुसरी काय अपेक्षा करणार!






























































