
राज्यात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत, पण तरुणांमधील कौशल्य कमी पडतेय, असा दावा राज्याचे कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केला. मुंबईतील वांद्रे येथे ‘इंडस्ट्री-इन्स्टिट्यूट फ्युचर समिट (आयएफएस) २०२६’ नुकतेच पार पडले. त्यात उद्घाटनप्रसंगी कौशल्यविकास मंत्री लोढा बोलत होते.
उद्योगांना आवश्यक कौशल्ये आणि उपलब्ध मनुष्यबळ यांच्यातील तफावत हेच सध्या सर्वात मोठे आव्हान असल्याचे लोढा म्हणाले. अशा उपक्रमांमुळे रोजगारक्षम मनुष्यबळ तयार होण्यास मदत होत आहे, असे लोढा म्हणाले.
एमआयटी इंडियातर्फे आयोजित या परिषदेला ५०० हून अधिक उद्योग क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी, उद्योजक, गुंतवणूकदार, शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विद्यार्थी उपस्थित होते. परिषदेची सांगता ‘मुंबई एचआर लीडरशिप अॅवॉर्ड्स’ वितरणाने झाली. या परिषदेत एआय, भविष्यातील रोजगार, कौशल्य विकास, स्टार्टअप्स, गुंतवणूक आणि उद्योग-शिक्षण सहकार्य या विषयांवर विविध तज्ज्ञांची पॅनेल चर्चा, गोलमेज बैठका, हॅकेथॉन, गुंतवणूकदार मेळावे आणि सामंजस्य करार झाले.


























































