
मढ आणि वर्सोवा दरम्यान प्रस्तावित असलेल्या पुलाच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या पर्यावरणीय परवानग्यांच्या प्रक्रियांना आता वेग आला आहे. तसेच या प्रकल्पासाठी कांदळवन पुनर्स्थापना आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेतर्फे मुख्य वनसंरक्षक (कांदळवन) विभागाला १२.५० कोटी रुपये देणार आहे. त्यामुळे बहुप्रतीक्षित केबल-स्टेड पुलाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
मालाड (पश्चिम) येथील मढ बेटावरील रहिवाशांना अंधेरी गाठण्यासाठी १८.६ किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे. मढ आणि वर्सोवा फेरीबोट सेवा उपलब्ध असली तरी ती रात्री १२ नंतर बंद होते. तसेच पावसाळ्यात ही सेवा अनेकदा जोखमीची ठरत असल्याने या ठिकाणी पूल उभारण्यात यावा अशी मागणी स्थानिक दीर्घकाळापासून करत होते. त्यानुसार महापालिकेने आधुनिक केबल-स्टेड पुलाच्या उभारणीचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालयाकडून कांदळवन वळतीकरणाच्या प्रस्तावाला तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे.
सर्व अटींची जबाबदारी महापालिकेवर
मंजुरीसोबत घालण्यात आलेल्या सर्व अटींची पूर्तता करण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे. उच्च न्यायालयात याचिका दाखल करून प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामासाठी आवश्यक परवानगी मिळविण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती पूल विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.


























































