
पावसाने मुंबईबरोबरच धरणक्षेत्रातही समाधानकारक हजेरी न लावल्यामुळे मुंबई शहर व उपनगरांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची चिन्हे आहेत. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱया तलावांतील पाणीसाठा तळ गाठू लागला आहे. पालिकेने रविवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सात धरणांमध्ये अवघा 7.08 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 38.58 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यंदाची परिस्थिती अधिक भीषण असल्याने तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.
जून महिना संपत आला तरी मुंबई शहर आणि आसपासच्या परिसरात पावसाने समाधानकारक हजेरी लावलेली नाही. केवळ एक दिवस जोरदार पाऊस झाला. मात्र पावसाचे सातत्य न राहिल्याने धरणांतील पाणी आटले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुलसी या सातही धरणांतील पाणीसाठय़ाने तळ गाठला आहे. पालिकेने रविवारी धरणक्षेत्रातील पाऊस आणि पाणीसाठय़ाच्या सद्यस्थितीची आकडेवारी जाहीर केली. ती चिंता वाढवणारी आहे.





























































