पनवेलची पाणीटंचाई मिटणार; पालिका वाढवणार ‘देहरंग’ची उंची, महासभेने दिली प्रस्तावाला मंजुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दरवर्षी जानेवारी महिन्यापासून पाणीटंचाईचा सामना करावा लागणाऱ्या पनवेल शहराला आता मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. देहरंग धरणाची उंची वाढवण्यासाठी महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली आहे. त्यानुसार या धरणाची उंची सुमारे २० मीटरपर्यंत वाढली जाणार असून शहराला १३१ एमएलडी अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे. हे पाणी उपलब्ध झाल्यानंतर पनवेलकरांची पाणीटंचाई कायमस्वरूपी मिटणार आहे.

पनवेल शहर आणि परिसराला प्रत्येक वर्षी पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागतो. करंजाडे, तळोजा, खारघर आणि कळंबोली परिसरात तर पावसाळा संपला की लगेच पाणीटंचाई होते. पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या माध्यमातून देहरंग धरणाची उंची वाढवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव तयार केला गेला. हा प्रस्ताव महासभेत मांडल्यानंतर नगरसेवकांनी यावर सविस्तर चर्चा करून तो मंजूर केला. त्यामुळे धरणाची उंची वाढवण्याच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झाला आहे.

एक हजार कोटीचा खर्च
देहरंग धरण हे पनवेल महापालिकेच्या मालकीचे आहे. धरणाची उंची वाढवण्यासाठी महापालिकेने १ हजार कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार केला आहे. धरणाची उंची २० मीटरने वाढवल्यास शहराला दररोज १३१ एमएलडी अतिरिक्त पाणी मिळणार आहे. यासाठी केंद्राच्या अर्बन चॅलेंज फंडमधून निधी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा निधी उपलबध झाल्यानंतर पालिकेला मोठा दिलासा मिळणार आहे.

२८ एमएलडीचा तुटवडा
पनवेलला रोज २५८ एमएलडी पाण्याची गरज आहे. मात्र विविध प्राधिकरणांकडून केवळ २३० एमएलडी पाणी मिळते. रोज २८ एमएलडीचा तुटवडा जाणवतो. स्वतःच्या मालकीच्या देहरंग धरणाचा विस्तार झाल्यानंतर ही पाणीटंचाई कमी होणार आहे. धरणाची उंची वाढवल्यास शहराला दरोज १३१.१८ एमएलडी पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. त्यामुळे पनवेल आणि परिसराची पाणीटंचाई कामयस्वरूपी मिटणार आहे.

५०० कोटींचा खर्च भूसंपादनावर होणार
देहरंग धरणाची उंची वाढवण्यासाठी महापालिकेला २१४ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. देहरंग हे धरण मातीचे असून ते बांधून ७४ वर्षे झाली आहेत. त्यामुळे पुनर्विकास गरजेचा आहे. एकूण १ हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. यातील ५०० कोटी भूसंपादनासाठी तर ५०० कोटी अन्य कामांवर खर्च होणार आहेत. उंची वाढल्यानंतर धरणाचा पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.