
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी रायगड जिल्ह्यातील भूमिपुत्र ८ जुलै रोजी थेट विधानभवनावर धडकणार आहेत. या मोर्चात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. आतापर्यंत उपोषण, निदर्शने, निवेदने अशा विविध प्रकारच्या माध्यमातून भूमिपुत्रांनी दिबांच्या नावाचा आग्रह राज्य व केंद्र सरकारकडे धरला होता. मात्र अजूनही त्यासंदर्भात कोणतीही ठोस पावले न उचलल्याने संतप्त ग्रामस्थ आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते विधानभवनावर धडक देऊन जबरदस्त एल्गार पुकारणार आहेत.
आज यासंदर्भात जासई येथील दि. बा. पाटील मंगल कार्यालयात एका बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी मंत्रालयाला दे धक्का देण्याचा निर्णय घेण्यात आला. दिबांच्या नावासाठी रश्मिता पोपेटा या तरुणीने गेल्या पाच दिवसांपासून पनवेलमधील चिंचपाडा येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. शिवसेनेचे उपनेते बबन पाटील यांनी या उपोषणाला व आंदोलनाला पाठिंब्याचे पत्रदेखील दिले आहे.
दिबांचे नाव देण्याचा निर्णय लवकरात लवकर घेतला नाही तर थेट दिल्लीच्या रामलीला मैदानावर उपोषण करण्याचा इशारा पोपेटा यांनी दिला आहे. ८ जुलै रोजी काढण्यात येणाऱ्या महामोर्चात शिवसेना ताकदीनिशी सहभागी होणार असल्याची माहिती माजी आमदार व जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांनी दिली.
असा निघेल मोर्चा
८ जुलै रोजी सकाळी १० वाजता चिंचपाडा येथून विधानभवनाच्या दिशेने मोर्चाचा शुभारंभ होणार आहे. त्यानंतर कळंबोलीमार्गे सानपाडा, चेंबूर व पूर्व द्रुतगती महामार्गावरून विधानभवनाकडे कूच करण्यात येणार आहे. आजच्या बैठकीस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बाळ्यामामा म्हात्रे, माजी आमदार बाळाराम पाटील, नगराध्यक्षा भावना घाणेकर, रायगड काँग्रेसचे अध्यक्ष मनीष पाटील आदी उपस्थित होते.





























































