
स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई शहराने मालमत्ता कराच्या वसुलीत कोटींची उड्डाणे घेण्यास सुरुवात केली आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत महापालिकेने 434 कोटी रुपयांच्या मालमत्ता कराची वसुली केली आहे. गेल्या वर्षी पहिल्या तीन महिन्यांत 372 कोटी रुपये जमा झाले होते. प्रॉपर्टी टॅक्स विभागाने वसुलीमध्ये गेल्या वर्षीचे रेकॉर्ड मोडून नवा इतिहास घडवला आहे.
मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहे. त्यामुळे कराची वसुली प्रभावीपणे होण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी विशेष उपक्रम सुरू केले आहेत. त्यामुळे दरवर्षी मालमत्ता कराच्या वसुलीत वाढ होत चालली आहे. यंदा आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत मालमत्ता कराची विक्रमी वसुली झाली आहे.
नवी मुंबई शहरात एकूण 3 लाख 55 हजार 771 करदाते आहेत. त्यापैकी 1 लाख 4 हजार 321 करदात्यांनी पहिल्या तीन महिन्यांत 434.02 कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा केला आहे. मालमत्ता कर विभागाचे उपआयुक्त डॉ. अमोल पालेवे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल महापौर सुजाता पाटील आणि महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सर्व करदात्यांचे आभार मानले आहेत.




























































