भ्रष्टाचार, चोरी झालीच पाहिजे; फक्त टक्केवारी कमी असावी! महायुतीचे उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांचे विधान, व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भ्रष्टाचार आणि चोरी झालीच पाहिजे; फक्त टक्केवारी कमी असावी, असे विधान अंबरनाथ नगरपालिकेचे महायुतीचे उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी केले आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सदाशिव पाटील यांनी भ्रष्टाचाराचे जाहीर समर्थन केले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सत्तेतील लोकांकडून लोकशाहीची क्रूर थट्टा सुरू असल्याची टीका होत आहे.

सभागृहाचे कामकाज सुरू असताना एका प्रश्नाला उत्तर देताना पाटील यांचा तोल सुटला. भर सभेत पत्रकारांसमोर ते बेधडकपणे म्हणाले, “भ्रष्टाचार असलाच पाहिजे, पण तो अति नको. माझ्या या मताशी तुम्ही सहमत नाही का?” त्यांच्या या विधानामुळे शेजारी बसलेल्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांनी हताश होऊन थेट डोक्याला हात लावला. “समोर पत्रकार आहेत, शांत राहा,” असे नगराध्यक्षांनी वारंवार बजावूनही पाटील यांनी बोलणे थांबवले नाही. उलट, “मी काय चुकीचं बोलतोय?” असा प्रतिप्रश्न करत त्यांनी आपल्या विधानाचे समर्थन केले.

दरम्यान, हा सर्व संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून, “चोरी करा, पण थोडी करा” हा महायुतीचा नवा कोणता राजकीय धर्म आहे? असा सवाल आता जनता विचारत आहे. जनतेच्या पैशांवर उघडपणे डल्ला मारण्याची भाषा करणाऱ्या या उपनगराध्यक्षांवर शासन काय कारवाई करणार, की नेहमीप्रमाणे पाठीशी घालणार? असा सवाल केला जात आहे. तसेच भ्रष्टाचाराला विरोध करण्याऐवजी त्याचे ‘प्रमाण’ ठरवणारे लोक जनतेचे प्रतिनिधी असू शकत नाहीत, अशी टीका सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे.

महायुतीचा नवा फंडा भ्रष्टाचार करा… पण कमिशन मात्र कमी घ्या! अंबरनाथ नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी भ्रष्टाचार झाला पाहिजे, पण टक्केवारी कमी हवी हे तारे तोडले आहेत! त्यांची यात चूक नाही राम मंदिराची तिजोरी जर चोरली जाऊ शकते तर नगरपालिकेच्या कामात भ्रष्टाचार तर झालाच पाहिजे! उपनगराध्यक्ष पाटील यांचे खरं तर अभिनंदन केले पाहिजे की त्यांनी प्रामाणिकपणे भ्रष्टाचाराचे समर्थन केले! शेवटी जनतेने निवडून दिले आणि विकास करायचा म्हटले म्हणजे नगरसेवकांच्या पोटापाण्याचा पण प्रश्न सोडवला पाहिजे! गल्लीपासून दिल्लीपर्यंत चोरी सुरू आहे तर यांनी तरी पाठी का राहायचे…त्यामुळे खा…पण कमी खा इतकाच सल्ला उपनगराध्यक्ष यांनी दिला आहे, अशी टीका खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.