देव तारी त्याला कोण मारी! शेकडो टन ढिगाऱ्याखाली मृत्यूशी झुंज; 8 दिवसांनंतर तरुण जिवंत बाहेर आला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देव तारी त्याला कोण मारी का म्हणतात याचा प्रत्यय व्हेनेझुएलामध्ये घडलेली घटना पाहून आल्याशिवाय राहणार नाही. गेल्या महिन्यात एकामागोमाग दोन शक्तिशाली भूकंपाच्या धक्क्याने व्हेनेझुएला हादरून गेला. या भूकंपामध्ये 2,600 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून हजारो लोक अद्यापही बेपत्ता आहेत. याच दरम्यान, एक चमत्कार घडला असून हजारो टन वजनाच्या ढिगाऱ्याखाली गेल्या 8 दिवसांपासून अडकलेला तरुण चक्क जिवंत बाहेर आला आहे. हेर्नान गिल असे या तरुणाचे नाव असून तो सुरक्षा रक्षकाचे काम करत होता. ही घटना चमत्कार असल्याचे व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांनी म्हटले आहे.

कॅटिया ला मार येथील गॅलेरिया प्लाया ग्रान्डे मॉल शेजारील पार्किंगच्या तळघरात हेर्नान गिल हा सुरक्षा रक्षक म्हणून कर्तव्यावर होते. 24 जून रोजी झालेल्या तीव्र भूकंपात संपूर्ण इमारत पत्त्यांसारखी कोसळली. यावेळी हेर्नान हा त्याच्या केबिनमध्ये अडकून पडले. जवळपास 140 टन वजनाचा ढिगारा त्याच्यावर पडला होता. तब्बल 8 दिवस तो या ढिगाऱ्याखाली होता.

ढिगाऱ्याखालून येणारा अगदी क्षीण आवाज कोस्टा रिकाच्या रेड क्रॉस पथकातील अ‍ॅलन माद्रिगल या पॅरामेडिकने पहिल्यांदा ऐकला. त्यानंतर व्हेनेझुएला, चिली, कोस्टा रिका, एल साल्व्हाडोर, मेक्सिको, पोर्तुगाल आणि अमेरिकेच्या विशेष बचाव पथकांनी संयुक्त मोहीम हाती घेतली. गुरुवारी रात्री उशिरा हेर्नानशी थेट संपर्क झाला. विशेष म्हणजे हेर्नानला बाहेर काढण्यात आले तेव्हा त्याला साधे खरचटलेही नसल्याचे वैद्यकीय पथकाने सांगितले.

हेर्नान अत्यंत सकारात्मक आणि उत्साही होता. अडकलेला असतानाही त्याने बचाव पथकाकडे त्यांच्या आवडीच्या फ्लेवरचे हायड्रेशन ड्रिंक मागितले. तो स्वतः बचाव पथकाचे मनोधैर्य वाढवत होतो, असे मेक्सिकन रेड क्रॉसच्या मार्को अँटोनियो फ्रँको यांनी सांगितले.

मृतांचा आकडा 2,600 पार

व्हेनेझुएलाच्या अध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांनी गुरुवारी रुग्णालयात जाऊन हेर्नान गिल याची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. ही आम्ही कधीही कल्पनेत न पाहिलेली नैसर्गिक आपत्ती आहे, पण हेर्नानची सुटका आम्हा सर्वांना आशेचा किरण दाखवणारी आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. दरम्यान, या भूकंपात आतापर्यंत 2,600 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून हजारो नागरिक अजूनही बेपत्ता आहेत.