Beed News- माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाची एैशीतैशी; ७० वर्षापूर्वीच्या जिर्ण शाळेत ११० विद्यार्थी रंगवत आहेत स्वप्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान दोन वर्षापासून राबवले जात आहे. महायुतीचा विकास बघायचा असेल तर थोडसं ग्रामीण भागात जावे लागेल. ग्रामीण भागातील शाळांची ही विदारक परिस्थिती सर्वत्र पहाण्यास मिळेल. आष्टी तालुक्यातील गणगेवाडी येथील जि.प.ची प्राथमिक शाळा ७० वर्षापासून याच ठिकाणी भरते. जिर्ण झालेल्या शाळेतच ११० विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेत आहेत. शाळे कधी कोसळेल आणि दुर्घटना घडेल सांगता येत नाही. मात्र जीव मुठीत घेवून विद्यार्थ्यांना याच शाळेत शिक्षण घ्यावे लागत आहे.

विकासाच्या नावाखाली निधीचे कोटीच्या कोटी उड्डाणे आश्वासनांची खैरात आणि छान सुंदर वाटणारे अभियान राबवले जाते. मंजूर झालेला निधी ग्रामीण भागापर्यंत पोहचतो का नाही असाही प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. दोन अडीच वर्षापासून जि.प.च्या शाळा वाचवण्यासाठी मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान राबवले जात आहे. केवळ घोषणा आणि आश्वासन या अभियानातून पाहाण्यास मिळते. आष्टी तालुक्यातील गणगेवाडी जि.प.ची प्राथमिक शाळा १९५६ साली सुरू झाली. पहिली ते आठवीपर्यंत ११० विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. शाळेला सहा शिक्षक कार्यरत आहेत. ७० वर्षाच्या या भिंतींना गेलेले मोठमोठे तडे , ठिकठिकाणी पडलेले भगदाड, छपराला लागलेली गळती, फुटलेल्या फरशा, आजुबाजूची दुर्गंधी शाळेची अवस्था बघून अंगावर काटा येतो. कोंडवाड्यासारखी परिस्थिती त्यात जिर्णे झालेली ही शाळा कशीबशी तग धरून आहे. मोडकळीला आलेल्या इमारतीमुळे दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात आहे. जीव मुठीत घेवून ११० विद्यार्थी आपले भविष्य घडवण्याचा प्रयत्न याच शाळेमध्ये करत आहेत.

दरवर्षी अहवाल निर्णय मात्र नाही

आष्टी तालुक्यातील गणगेवाडी जि.प.प्राथमिक शाळेची इमारत ७० वर्षे जुनी आहे. भींतीला तडे गेले आहेत. ठिकठिकाणी भगदाडही पडले आहे. शाळेची जिर्ण झालेली अवस्था भयभीत करणारी आहे. असा अहवाल दरवर्षी या शाळेकडून वरिष्ठांना सादर करण्यात येतो. मात्र नविन इमारत किंवा दुरूस्तीबाबत कोणताही ठोस निर्णय कधीच झाला नाही. – नवनाथ भोरे, मुख्याध्यापक गणगेवाडी.