हरयाणात पोलीस आणि बिश्नोई गँगच्या शूटरमध्ये चकमक; दोन कुख्यात गुन्हेगार ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Lawrence-Bishnoi

बहादूरगड-बलौर बायपासजवळ मंगळवारी मध्यरात्री पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये झालेल्या एका थरारक चकमकीत लॉरेन्स बिश्नोई गँगचे दोन कुख्यात शूटर ठार झाले आहेत. बहादूरगड विशेष कृती दल (एसटीएफ), हरयाणा पोलीस आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली. या चकमकीत मारल्या गेलेल्या गुन्हेगारांची ओळख प्रवेश (रा. तिब्बा दानाशेर, हिसार) आणि हिमांशू (रा. जाखोद खेडा) अशी आहे. मारले गेलेले दोन्ही शूटर गेल्या महिन्यात हांसी येथे झालेल्या एका जिम चालकाच्या हत्येतील मुख्य आरोपी होते आणि त्यांच्यावर प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

एसटीएफचे पोलीस अधीक्षक विक्रांत भूषण यांनी या कारवाईबाबत माहिती देताना सांगितले की, हे गुन्हेगार बहादूरगड परिसरात एका मोठ्या गुन्ह्याची योजना आखत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे दिल्ली विशेष पथक आणि बहादूरगड स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) परिसरात सापळा रचला. पोलिसांना पाहताच दबा धरून बसलेल्या गुन्हेगारांनी अचानक पोलिसांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. आत्मरक्षणासाठी पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. या चकमकीदरम्यान दोन्ही बाजूंनी सुमारे 12 ते 13 गोळ्या झाडण्यात आल्या.

या चकमकीत पोलिसांचा एक कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी उच्च वैद्यकीय केंद्रात दाखल करण्यात आले आहे. गुन्हेगारांनी केलेल्या गोळीबारात इतर चार पोलीस कर्मचाऱ्यांनाही लक्ष्य करण्यात आले होते. मात्र, त्यांनी बुलेटप्रूफ जॅकेट घातलेले असल्याने त्यांचे प्राण थोडक्यात वाचले. या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.