
तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान होणे ही ऐतिहासिक गरज असल्याचे सांगत तेलंगणातील जनतेला त्यासाठी पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. तेलंगणा राज्याची निर्मिती करण्याचे श्रेय सोनिया गांधी यांना जात असल्याने त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा मार्ग असल्याचेही त्यांनी म्हटले.
मिदजिल मंडल येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन केल्यानंतर आयोजित जाहीर सभेत बोलताना रेवंत रेड्डी म्हणाले की, सोनिया गांधी यांच्यावर विश्वास ठेवा. जनतेच्या पाठिंब्यामुळे काँग्रेस 2034 पर्यंत सत्तेत राहील. यासाठी राहुल गांधी यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाला जनतेने पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी रेवंत रेड्डी यांनी माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि भारत राष्ट्र समिती (बीआरएस)वर जोरदार टीका केली. केसीआर यांच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत तेलंगणात कुशासन झाले, असा आरोप त्यांनी केला.
मागील सरकारने राज्यावर 8 लाख कोटी रुपयांहून अधिक कर्जाचा बोजा टाकला, तर केसीआर यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या प्रमाणात संपत्ती जमा केली, असा आरोपही त्यांनी केला. तसेच सत्तेत पुनरागमनाची इच्छा व्यक्त करणारे केसीआर विधानसभा कामकाजापासून मात्र दूर राहत असल्याची टीकाही रेवंत रेड्डी यांनी केली.

























































