
अयोध्येच्या राम मंदिरातील देणगीघोटाळा प्रकरणात नवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाला (SIT) आरोपींच्या चौकशीदरम्यान आणि त्यांनी दाखवलेल्या ठिकाणांवरून ‘श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’ची अनेक बनावट पावती पुस्तके मिळवण्यात यश आले आहे. या बनावट पावत्यांच्या माध्यमातून भाविकांची फसवणूक करून लाखो रुपयांची वसुली केल्याची कबुलीही आरोपींनी पोलिसांकडे दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये टिन्नू यादव, लवकुश मिश्रा, करुणेश पांडे, अनुकल्प मिश्रा आणि इतरांचा समावेश आहे. सुरुवातीच्या काळात जेव्हा एखादा भाविक मंदिरात मोठी देणगी देण्याची इच्छा व्यक्त करायचा, तेव्हा हे आरोपी संशय येऊ नये म्हणून ट्रस्टचा हुबेहुब लोगो असलेली बनावट कागदी पावती त्यांना द्यायचे आणि पैसे स्वतःच्या खिशात घालायचे. ही पावती अगदी खऱ्या पावतीसारखीच दिसत असल्याने आजवर कोणालाही याचा संशय आला नव्हता. मात्र, राम मंदिर प्रशासनाने देणगीची संपूर्ण व्यवस्था ऑनलाईन केल्यानंतर आणि थेट बँकेत पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा सुरू केल्यावर आरोपींनी या कागदी पावत्यांचा वापर करणे बंद केले.
‘SIT केवळ लोकांना मूर्ख बनवतेय’ – अरविंद केजरीवाल यांचा आरोप
या संपूर्ण प्रकरणावरून राजकारणही तापले आहे. आम आदमी पक्षाचे (AAP) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी या तपासावर तीव्र आक्षेप घेतला आहे. “राम मंदिर देणगी घोटाळा प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि खरे चोर भलतेच कोणीतरी आहेत. एसआयटी (SIT) केवळ लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी आणि त्यांना मूर्ख बनवण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. देशातील जनतेला स्पष्टपणे दिसत आहे की, या प्रकरणातील बड्या माशांना वाचवण्यासाठी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे केजरीवाल यावेळी म्हणाले.
राम मंदिर देणगी चोरीतून आरोपी अविनाशने उधळले 19 लाख
यापूर्वी या प्रकरणातील एक प्रमुख आरोपी अविनाश शुक्ला याने देणगी चोरीच्या रकमेतील सुमारे 19 लाख रुपये मित्रांवर उधळले. प्रेयसीला आयफोन भेट म्हणून दिल्याचे उघड झाले. त्याने भावाच्या लग्नावरदेखील सहा लाख रुपये खर्च केले. आता अविनाश शुक्लाने केलेल्या या व्यवहारांची तसेच त्याची बँक खाती आणि संपत्तीचा तपास सुरू करण्यात येत आहे.




























































