
संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस येथील घडशीवाडीमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर स्वरूपात समोर आला आहे. सध्या पावसाळा असल्यामुळे तात्पुरता दिलासा मिळत असला तरी उन्हाळा सुरू होताच परिस्थिती अत्यंत बिकट होते, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे.
सन २०१३-१४ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना अंतर्गत घडशीवाडी साठी विहीर मंजूर करण्यात आली होती. विहिरीचे खोदकाम पूर्ण झाले, मात्र त्यानंतरची महत्त्वाची कामे आजतागायत प्रलंबितच आहेत. तब्बल १३ वर्षे योजना अपूर्ण अवस्थेत पडून असल्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उन्हाळ्यातील तीन महिन्यांत गावातील नागरिकांना सुमारे १.५ किलोमीटर अंतरावरून बनाचीवाडी येथून पाणी आणावे लागते, ज्यामुळे विशेषतः महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
हा प्रश्न अलीकडील प्रभाग सभेमध्ये तीव्रतेने मांडण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. विशाखा ताई विजय कुवळेकर तसेच मा. संतोष थेराडे साहेब यांनी याची गांभीर्याने दखल घेतली. त्यांच्या सूचनेनुसार दिनांक १० जुलै २०२६ रोजी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता सुदेश ठोंबरे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
मात्र, केवळ पाहण्या करून प्रश्न सुटणार नाही, अशी ग्रामस्थांची ठाम भूमिका आहे.
“पावसाळ्यात प्रश्न संपुष्टात येतो, पण उन्हाळ्यात आमचं जगणं कठीण होतं,” अशी तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली. येत्या उन्हाळ्यापूर्वी उर्वरित कामे पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. आता प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्याकडून ठोस निर्णयाची अपेक्षा असून, यावेळी तरी घडशीवाडीला कायमस्वरूपी पाणीपुरवठा मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





























































