राम मंदिराचे श्रेय घेता, तर मग देणगी चोरीचेही श्रेय घ्या; प्रियांक खरगे यांची पंतप्रधान मोदी आणि आरएसएसवर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकचे मंत्री आणि काँग्रेस नेते प्रियांक खरगे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. ‘जर तुम्ही राम मंदिर उभारणीचे श्रेय घेत असाल, तर आता मंदिर निधीतील देणगी चोरीचीही जबाबदारी संघाला घ्यावीच लागेल’, असा थेट हल्लाबोल खरगे यांनी केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एका पत्रकार परिषदेत बोलताना प्रियांक खरगे यांनी राम मंदिर निधीमधील गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

मोहन भागवतांना थेट आव्हान

प्रियांक खरगे म्हणाले, “जर तुम्ही राम मंदिर बांधल्याचे श्रेय घेतले आहे, तर तुम्ही या देणगी चोरीचेही श्रेय घ्यायला हवे. तुमची कोणतीही नोंदणी नाही आणि तुम्ही दक्षिणा घेता, मग यातील किती रक्कम तुमच्याकडे आली? बंद दाराआड चर्चा करण्यापेक्षा जाहीरपणे जनतेसमोर या आणि हे चोर कोण आहेत, हे सांगा. यावर तुम्ही आणि पंतप्रधान गप्प का आहात?” असा सवाल करत खरगे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना थेट जाहीर पत्रकार परिषद घेण्याचे आव्हान दिले आहे. राम मंदिर निधीतील गैरव्यवहारावरून सध्या देशभरात वाद निर्माण झाला असून त्याच पार्श्वभूमीवर प्रियांक खरगे यांनी ही टीका केली आहे.

केवळ राम मंदिराच्या मुद्द्यावरच नाही, तर देशभरात गाजत असलेल्या नीट पेपरफुटी, महाराष्ट्र टीईटी आणि यूजीसी-नेट परीक्षांमधील गोंधळावरूनही प्रियांक खरगे यांनी मोदी सरकारला धारेवर धरले. पंतप्रधानांच्या परीक्षा पे चर्चा या उपक्रमाची खिल्ली उडवत खरगे म्हणाले, “पंतप्रधान मोदी नीट पेपरफुटीवर चर्चा किंवा OSM (ऑन-स्क्रीन मार्किंग) वर चर्चा कधी करणार आहेत?”