
गेली काही महिने मिंध्यांचे लोक पैश्यांच्या बॅगा घेऊन नाशिकमध्ये फिरत आहेत. पण आमच्या एकाही नगरसेवकांना त्यांना आपल्या घराचा उंबरठा ओलांडू दिलेला नाही, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत म्हणाले. तसेच येत्या 18 जुलैला नागपुरात रामरक्षा आंदोलन होणार असून या आंदोलनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेही उपस्थित राहणार आहेत अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
ज्या पद्धतीने सिद्धिविनायक मंदिर आम्ही सांभाळलं, त्याच्या निधीचा वापर आम्ही सामाजिक कार्यासाठी विनियोग केला, तो यापूर्वी कधीच झाला नव्हता. आता आमचे एक कार्यकर्ते भेटायला आले होते, ते घाटकोपर परिसरात डायलिसिस केंद्र सुरू करत आहेत. त्यांची स्वतःची जागा आहे, आणि आदेश बांदेकर अध्यक्ष असताना एक रक्कम मंजूर केली होती. त्यानंतर सत्ता बदलल्यावर ते कार्यकर्ते नव्या अध्यक्षांना भेटायला गेले तेव्हा अध्यक्षांनी हे केंद्र रद्द केले. जर आमच्या पक्षात प्रवेश केला तरच हा निधी मंजूर केला जाईल अशी अट घातली गेली. अशा लोकांकडून तुम्ही काय अपेक्षा करणार? सिद्धिविनायक न्यासाचे आदेश बांदकर, संजय सावंत यांनी उत्तम काम केलं, असं काम कधीच होऊ शकत नाही, असे संजय राऊत म्हणाले.
18 जुलैला शिवसेना पक्षप्रमुख नागपुरात रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्यासाठी येत आहेत. राम मंदिर लुटीप्रकरणी देशात असंतोष आहे. आजही मुख्य आरोपी पकडलेले नाहीत. अजूनही ती लूट सुरू आहे आणि स्वतःला हिंदुत्ववादी समजणाऱ्या संस्था आणि संघटनांनी पुरस्कृत केलेले डाकू आणि चोर अयोध्येत आहेत. त्यांनी राम मंदिर आणि रामाची पूर्ण बदनामी केलेली आहे. म्हणून शिवसेनेने रामरक्षा आंदोलन सुरू केलेलं आहे, त्याचा एक टप्पा मुंबईत पार पडला, त्याचा दुसरा टप्पा महाराष्ट्राच्या उपराजधानीत 18 तारखेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि असंख्य नेते, कार्यकर्ते आणि रामप्रेमी जनता या आंदोलनात सहभागी होतील, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
गेली काही महिने मिंध्यांचे लोक पैश्यांच्या बॅगा घेऊन नाशिकमध्ये फिरत आहेत. पण आमच्या एकाही नगरसेवकांना त्यांना आपल्या घराचा उंबरठा ओलांडू दिलेला नाही. लाडकी बहीण योजनेत 85 लाखांपेक्षा बोगस लाभार्थ्यांना लाभ दिला, ती गंभीर बाब आहे. आता सरकार या पैश्यांची वसूली कशी करणार? यालाच आर्थिक बेशिस्त म्हणतात. ज्यांची गुणवत्ता नाही, ज्यांना मेरिटवर हा लाभ घेता येत नाही, अशा लाखो बोगस लोकांना मतं विकत घेण्यासाठी, निवडणूक विकत घेण्यासाठी तुम्ही शेकडो कोटी रुपये दिले, ही आर्थिक बेशिस्त आहे. आर्थिक बेशिस्तीच्या संदर्भात महाराष्ट्राची ही बदनामी होत आहे. महाराष्ट्राला कलंक लागला म्हणून याबाबत मुख्यमंत्र्यांनी पदत्याग केला पाहिजे, असेही संजय राऊत म्हणाले.






























































