महाड एमआयडीसीतील सांडपाणी शेतात सोडले, शेतकऱ्यांसमोर पेरणीचे मोठे संकट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आभाळ फाटल्यागत कोसळणाऱ्या पावसामुळे महाड तालुक्यातील नद्यांना प्रचंड पूर आला. शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरून रहिवाशांचे अतोनात नुकसान झाले होते. आता कोल, वडवली, शिरगाव, कोथिरे यांसह पाच गावांतील शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. पुराचा फायदा उठवत महाड एमआयडीसीमधील कारखानदारांनी आपल्या कंपन्यांमधील रसायनयुक्त सांडपाणी थेट शेतात सोडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर पेरणीचे मोठे संकट उभे ठाकले असून लवकरात लवकर पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

महाड एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणावर केमिकल्सचे कारखाने आहेत. सर्व नियम पायदळी तुडवून हे कारखाने आतील सांडपाणी मनमानीपणे कुठेही सोडून देतात. महाडमध्ये चार-पाच दिवस तुफानी पाऊस झाला आणि होत्याचे नव्हते झाले. बाजारपेठांसह असंख्य घरे पाण्यात बुडाली. तर महाड तालुक्यातील कोल, वडवली, शिरगाव, कोथिरे यांसह पाच गावांतील शेतीमध्ये कारखान्यांनी आपले सांडपाणी सोडले आहे. त्यामुळे या शेतीचे अतोनात नुकनसान झाले आहे. विशेष म्हणजे दरवर्षी हा प्रकार केला जातो. त्यामुळे शेतातील मातीचा कस कमी झाला असून यंदादेखील पाच गावांतील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.

सावित्री नदीमध्ये नुकसानभरपाई द्या, अन्यथा उड्या मारू

महाड तालुक्याच्या पाचही गावांमधील शेती रसायनयुक्त सांडपाण्यामुळे धोक्यात आली आहे. येथील बहुतेक शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच चालतो. पण शेतात केमिकलचे पाणी सोडल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. लवकरात लवकर पंचनामे करून गणेशोत्सवापूर्वी नुकसानभरपाई द्या अन्यथा ग्रामस्थ सावित्री नदीमध्ये उड्या मारून आपले आयुष्य संपवतील, असा इशारा महाड तालुका शेतकरी संघटनेचे महाड तालुका अध्यक्ष अविनाश चौधरी यांनी दिला आहे