अंतराळ – उत्सुकता ‘मिशन आगमन’ची

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> श्रीनिवास औंधकर

भारताने गेल्या दशकभरात अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे. आता देशातील पहिली स्पेस-टेक युनिकॉर्न 1.1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त मूल्य असलेली कंपनी ‘स्कायरूट एरोस्पेस’ आपले पहिले खासगी ऑर्बिटल रॉकेट ‘पाम-1’ लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे रॉकेट प्रक्षेपित केले जाईल. या मोहिमेला ‘मिशन आगमन’ असे नाव देण्यात आले आहे.

भारताने अंतराळात स्वतच्या बळावर निर्माण केलेले हे खासगी साम्राज्य आगामी काळात देशाला आत्मनिर्भर बनवण्यासोबतच आर्थिकदृष्टय़ाही अत्यंत फायदेशीर ठरेल यात शंका नाही. तांत्रिक नवकल्पना आणि सरकारी पाठबळ यांच्या योग्य संगमामुळे भारताचा अंतराळातील हा खासगी प्रवास आता अनंत आकाशाला गवसणी घालण्यासाठी सज्ज झाला आहे.

भारताच्या अंतराळ संशोधनाचा इतिहास हा नेहमीच अभिमानास्पद राहिला आहे. हा प्रवास चंद्राच्या दक्षिण ध्रुवापर्यंत पोहोचला आहे. मात्र आजवर हा संपूर्ण प्रवास प्रामुख्याने सरकारी पातळीवर म्हणजेच ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ अर्थात इस्रोच्या माध्यमातूनच पार पडला. आता या प्रवासात एक अत्यंत महत्त्वाचे आणि ऐतिहासिक वळण आले आहे. बदलत्या काळाची गरज ओळखून भारताने आपल्या अंतराळ धोरणात मोठे आणि क्रांतीकारक बदल केले आहेत. 2020 मध्ये केंद्र सरकारने अंतराळ क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयाचे अत्यंत सकारात्मक परिणाम आता जमिनीवर दिसू लागले आहेत. भारताच्या खासगी क्षेत्राने अंतराळ तंत्रज्ञानात थेट कक्षीय (ऑर्बिटल) पातळीवर प्रवेश केला आहे. ‘स्कायरूट एरोस्पेस’ या हैदराबादस्थित स्टार्टअप कंपनीने विकसित केलेल्या ‘पाम-1’ या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथे ‘स्कायरूट एरोस्पेस’च्या इन्फिनिटी कॅम्पसचे उद्घाटन केले होते. त्या वेळी त्यांनी ‘पाम-1’ जगासमोर सादर केले. एकाच वेळी अनेक उपग्रह त्यांच्या कक्षेत सोडू शकणारे हे पहिले खासगी रॉकेट आहे. हे एक बहुस्तरीय प्रक्षेपण वाहन असून ते प्रामुख्याने लहान उपग्रहांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत स्थापित करण्यासाठी डिझाईन केलेले आहे. भारतीय अंतराळ कार्पामाचे जनक डॉ. पाम साराभाई यांच्या नावावरून या रॉकेट मालिकेचे नाव ‘पाम’ ठेवण्यात आले आहे. हे रॉकेट संपूर्णपणे कार्बन कंपोझिट साहित्यापासून बनवले गेले आहे, ज्यामुळे त्याची रचना अत्यंत हलकी, पण तितकीच मजबूत झाली आहे. या रॉकेटमध्ये अत्याधुनिक थ्रीडी-प्रिंटेड लिक्विड इंजिनचा वापर करण्यात आला आहे. भारताच्या खासगी अंतराळ निर्मिती क्षेत्रातील एक मोठे यश मानले जाते. या रॉकेटची एकूण वाहून नेण्याची क्षमता सुमारे 300 किलोग्रॅम आहे. हे रॉकेट 500 किलोमीटर उंचीवर असलेल्या पृथ्वीच्या खालच्या कक्षेत उपग्रह यशस्वीरित्या पोहोचवू शकते. ‘पाम-1’ हे प्रामुख्याने घन इंधन आणि द्रव इंधन या दोन्हींच्या मिश्रणावर चालणारे रॉकेट आहे. याच्या सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये घन इंधनाचा वापर केला जातो, जो रॉकेटला सुरुवातीला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून बाहेर पडण्यासाठी प्रचंड गती देतो, तर शेवटच्या टप्प्यात अचूक कक्षा गाठण्यासाठी अत्याधुनिक द्रवरूप इंधनावर चालणाऱ्या इंजिनचा वापर केला जातो. हे इंजिन अंतराळात अनेक वेळा चालू आणि बंद केले जाऊ शकते. यामुळे उपग्रहांना त्यांच्या नियोजित कक्षेत अचूकपणे सोडता येते.

भारतात अंतराळ क्षेत्र दीर्घकाळापासून केवळ सरकारी नियंत्रणाखाली होते, परंतु 2020 मध्ये केंद्र सरकारने अंतराळ क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. खासगी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना इस्रोच्या पायाभूत सुविधांचा वापर करता यावा यासाठी ‘इन-स्पेस’ या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली. ‘पाम-1’ च्या निर्मिती आणि प्रक्षेपणामध्ये इस्रो आणि इन-स्पेस या दोन्ही संस्थांनी ‘स्कायरूट एरोस्पेस’ला मोलाचे सहकार्य केले आहे.

‘स्कायरूट एरोस्पेस’ने यापूर्वी 2022 मध्ये ‘पाम-एस’ या छोटय़ा प्रायोगिक रॉकेटचे यशस्वी उड्डाण केले होते. त्या मोहिमेचे नाव ‘मिशन प्रारंभ’ असे होते. हे रॉकेट पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालून परत आले होते. त्याने कोणतेही उपग्रह प्रक्षेपित केले नव्हते. मात्र पोटात प्रत्यक्ष उपग्रह घेऊन त्यांना पृथ्वीच्या कक्षेत प्रस्थापित करणे हे उपकक्षीय उड्डाणापेक्षा हजार पटीने अधिक कठीण आणि आव्हानात्मक असते. ‘पाम-1’ च्या या ऑर्बिटल मोहिमेमुळे स्कायरूटने ही तांत्रिक गुंतागुंत यशस्वीरीत्या पार पाडल्याचे सिद्ध केले आहे. इस्रोने सतीश धवन अंतराळ केंद्र (श्रीहरीकोटा) येथील आपले प्रक्षेपण पॅड आणि ट्रकिंग सिस्टिम खासगी रॉकेटसाठी उपलब्ध करून दिली असून सार्वजनिक-खासगी भागीदारीचे हे एक उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे. या रॉकेटचा सर्वात आश्चर्यकारक पैलू म्हणजे त्याचे तंत्रज्ञान. ‘पाम-1’ ला पायलट नाही. त्याला नियंत्रित करण्यासाठी जॉयस्टिकचीसुद्धा गरज नाही. यात एक अत्यंत प्रगत ऑनबोर्ड इंटेलिजन्स सिस्टिम आहे, जी रॉकेटला स्वतचे निर्णय घेण्याचे सामर्थ्य देते.

जगभरात इंटरनेट कनेटिव्हिटी, हवामान अंदाज, कृषी क्षेत्रातील देखरेख आणि आपत्ती व्यवस्थापन यासाठी शेकडो लहान उपग्रह अंतराळात सोडले जात आहेत. आजवर या उपग्रहांना मोठय़ा रॉकेटसोबत ‘राईड-शेअर’ (सहप्रवासी) म्हणून जावे लागत होते. यामुळे त्यांना मुख्य उपग्रहाच्या वेळेनुसार आणि कक्षेनुसार तडजोड करावी लागत असे.
‘पाम-1’ सारखी लहान खासगी रॉकेटस् या समस्येवर एक उत्तम उपाय आहेत. हे रॉकेट जागतिक ग्राहकांना ‘ऑन-डिमांड’ (मागणीनुसार) आणि परवडणाऱ्या दरात प्रक्षेपण सेवा उपलब्ध करून देणार आहे. म्हणजेच कोणत्याही कंपनीला किंवा देशाला त्यांचा लहान उपग्रह अत्यंत कमी खर्चात आणि स्वतच्या वेळेनुसार अंतराळात सोडणे आता शक्य होणार आहे. जागतिक व्यावसायिक अंतराळ बाजारपेठेत सध्या भारताचा वाटा सुमारे 2 ते 3 टक्के आहे. केंद्र सरकारने 2030 पर्यंत हा वाटा 10 टक्क्यांपेक्षा जास्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ‘पाम-1’ चे यश हे या उद्दिष्टाच्या दिशेने टाकलेले सर्वात मोठे पाऊल ठरणार आहे. यामुळे भारताकडे जागतिक व्यावसायिक अंतराळ केंद्र म्हणून पाहिले जाईल.

अर्थात, या क्षेत्रात ‘स्कायरूट एरोस्पेस’ आणि भारतासमोरील आव्हाने संपलेली नाहीत. जागतिक स्तरावर अमेरिकेची ‘स्पेसएक्स’सारखी महाकाय कंपनी आणि इतर अनेक आंतरराष्ट्रीय स्टार्टअप्स आधीच कमी खर्चात उपग्रह प्रक्षेपणाचे तंत्रज्ञान विकसित करत आहेत. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारताला प्रक्षेपणाचा खर्च सातत्याने कमी ठेवावा लागेल. तसेच रॉकेटचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर वाढवावे लागेल, जेणेकरून एका वर्षात अनेक प्रक्षेपणे करणे शक्य होईल.

‘स्कायरूट एरोस्पेस’ यापुअधिक क्षमतेची ‘पाम-2’ आणि ‘पाम-3’ ही रॉकेट विकसित करण्याच्या कामात गुंतली आहे. ती अपामे 500 किलोग्रॅम आणि 700 किलोग्रॅम वजनाचे उपग्रह अंतराळात नेण्यास सक्षम असतील. ‘पाम-1’ च्या या यशस्वी उड्डाणामुळे भारतातील ‘अग्निकुल कॉसमॉस’ आणि ‘पिससेल’ यांनाही मोठी प्रेरणा मिळणार आहे.
(लेखक खगोलशास्र अभ्यासक आहेत)