होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद होणार? अमेरिका-इराण युद्धामुळे जग महामंदीकडे जात आहे; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतची शस्त्रसंधी संपल्याची घोषणा केली आणि सर्व जगाचे टेन्शन पुन्हा एकदा वाढले आहे. काही दिवसांपासून शस्त्रसंधीमुळे होर्मुझ सामुद्रधनीतील वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता वर्तवली जात होती. इराणनेही महिन्याभरात वाहतूक पूर्ववत करू, असे सांगितले होते. मात्र, आता तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद होण्याची शक्यता असल्याने जगाची चिंता वाढली आहे.

जगातील सर्वात महत्त्वाच्या जलमार्गांपैकी एक असलेली होर्मुझची सामुद्रधुनी सध्या रणांगण बनली आहे. हा अरुंद जलमार्ग पर्शियन आखाताला ओमानच्या आखाताशी जोडतो. इराणच्या उत्तरेला आणि ओमानच्या दक्षिणेला असलेला हा जलमार्ग केवळ ३३ किलोमीटर रुंद आहे. मात्र, यातून जगातील सुमारे २० टक्के तेल आणि मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वायू व खते वाहून नेली जातात. इराण-अमेरिका-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने हा महत्त्वाचा जलमार्ग बंद करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामुळे जागतिक तेल, वायू आणि खतांच्या पुरवठ्यात व्यत्यय आला आहे.

२०२६ च्या इराण युद्धादरम्यान, इराणने हा मार्ग बंद करण्याची धमकी दिली आणि हल्ले केले. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थाही हादरली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील सर्वात व्यस्त तेल वाहतूक मार्ग आहे. यातून दररोज अंदाजे २० दशलक्ष बॅरल तेल जाते.

हिंदुस्थान, चीन, जपान आणि दक्षिण कोरियासारखे आशियाई देश या जलमार्गावर सर्वाधिक अवलंबून आहेत. या जलमार्गावर इराणचे नियंत्रण आहे. त्यामुळे युद्ध सुरू झाल्यानंतर इराणने मार्च २०२६ पासून जहाजांवर हल्ले करणे, सुरुंग पेरणे आणि अनेक जहाजे अडवण्यास सुरुवात केली. परिणामी, वाहतूक ९५% ने कमी झाली. यामुळे तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आणि जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली.

त्यानंतर काही काळासाठी युद्धविराम झाला, पण इराणने पुन्हा दबाव आणला. हा प्रदेश आजही तणावपूर्ण आहे. मेर्स्क आणि इतर शिपिंग कंपन्यांनी आपले कामकाज थांबवले. अनेक टँकर पर्शियन आखातात अडकून पडले. हे जलयुद्ध १९८० च्या दशकातील टँकर युद्धाची आठवण करून देणारे होते, पण यावेळी नुकसान खूप जास्त होते. या युद्धाचा परिणाम केवळ तेलापुरता मर्यादित नाही. खते, अमोनिया आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. खतांच्या कमतरतेमुळे पीक उत्पादनात घट झाल्याने आशिया आणि आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये अन्नसंकट अधिक गडद झाले आहे. तेलाच्या वाढत्या किमतींमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत, वाहतूक खर्च वाढला आहे आणि महागाई सर्वत्र पसरली आहे.

हिंदुस्थानसारख्या आयातीवर अवलंबून असलेल्या देशांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. शेअर बाजार कोसळले आहेत, विम्याचे दर प्रचंड वाढले आहेत आणि पर्यायी मार्ग (आफ्रिकेला वळसा घालून) अधिक महाग ठरत आहेत. अनेक तज्ञांच्या मते, जर हे संकट असेच चालू राहिले, तर जागतिक मंदी येऊ शकते, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.