व्हिएतनामध्ये हिंदुस्थानी पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली, बचावकार्य सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्हिएतनाममधील फु क्वोक बेटाजवळ अनेक हिंदुस्थानी पर्यटकांना घेऊन जाणारी बोट शनिवारी उलटली. बोट अपघातानंतर घटनास्थळी युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. हिंदुस्थानी दूतावास स्थानिक प्रशासनाच्या सतत संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, हिंदुस्थानच्या दूतावासाने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत अपघाताची माहिती दिली. काही तासांपूर्वी फु क्वोक बेटाजवळ हा अपघात घडला. बोटीमध्ये अनेक हिंदुस्थानी पर्यटक होते. स्थानिक प्रशासन घटनास्थळी शोध आणि बचाव कार्य करत असल्याचे दूतावासाने सांगितले. बोटीमध्ये किती पर्यटक होते याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही.

बाधित कुटुंबांना माहिती आणि मदत देण्यासाठी हो ची मिन्ह सिटी येथील हिंदुस्थानच्या वाणिज्य दूतावासात (Consulate General of India) एक नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाशी +84 36 281 7930, +84 91 552 37 14 आणि +84 33 452 0414 या क्रमांकांवर संपर्क साधता येईल, असे दूतावासाने सांगितले.