
रेणापूर तालुक्यातील खरोळा येथे शेतातील कॉपर वायरची चोरी करणाऱया तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यांना मारहाण करण्यात आली. मारहाणीचे व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रसारित झाले होते. पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच मारहाण केली म्हणून मारहाण करणाऱया दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खरोळा येथे शेतातील कॉपर वायर चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुलांना पकडण्यात आले. चोरी करताना पकडले म्हणून चोरटय़ांना मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली. मारहाण केल्याचे समाज माध्यमांवर व्हिडिओ प्रसारित करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मायने तसेच पोलीस निरीक्षक सुधाकर देडे पोलीस ठाणे रेणापूर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. ग्रामस्थ, प्रतिष्ठत व्यक्ती व संबंधित कुटुंबीयांशी संवाद साधून शांतता व सलोखा राखण्याचे आवाहन केले.
या प्रकरणात कायदा हातात घेतल्या प्रकरणी संबंधित तीन बालक यांच्यापैकी एकाच्या फिर्यादीवरून सचिन नारायण राऊतराव (40) तसेच नितीन गोविंद शिंदे (38) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




























































