सांगोल्यात 15 लाखांचा भेसळयुक्त दूधसाठा नष्ट, अजिंक्यतारा मिल्क इंडस्ट्रीजला टाळे; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांगोला तालुक्यातील जवळा येथील अंजिक्यराणा मिल्क इंडस्ट्रीजवर अन्न व औषध विभागाच्या पथकाने आज छापा टाकत 15 लाखांचे 37 हजार 532 लिटर भेसळयुक्त दूध जप्त करून नष्ट केले. तसेच अंजिक्यराणा मिल्क इंडस्ट्रीजला टाळे ठोकून त्रुटींची पूर्तता करेपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती सहायक आयुक्त (अन्न) साहेबराव देसाई यांनी दिली. अकलूज, अक्कलकोटनंतर सांगोल्यात भेसळयुक्त दुधावर कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

आज सकाळी अन्न व औषध विभागाच्या सोलापूर कार्यालयास मिळालेल्या माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी गणेश कदम, मंगेश लवटे यांनी बुरुंगेवाडी, जवळा येथील अंजिक्यराणा मिल्क इंडस्ट्रीजवर अचानक छापा टाकला. तपासणीदरम्यान दुधाचे 4 नमुने घेण्यात आले, तर उर्वरित 37 हजार 532 लिटर दूध जप्त करण्यात आले.

येथील तपासणीत संकलन व चिलिंग युनिटचा वैध परवाना नसणे, स्पॉट टेस्टमध्ये दुधात पाणी मिसळल्याचे आढळणे, ‘एसएनएफ’चे प्रमाण विहित मर्यादेपेक्षा कमी असणे, खरेदी-विक्रीची पद्धतशीर नोंद नसणे व ‘अनुसूची’ मधील नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर भेसळयुक्त दुधाचा साठा जागेवरच नष्ट करण्यात आला. दरम्यान, तपासणीत आढळलेल्या त्रुटींची पूर्तता होईपर्यंत व वैध अन्न परवाना घेईपर्यंत तत्काळ व्यवसाय बंद करण्याचे निर्देश अंजिक्यराणा मिल्क इंडस्ट्रीजला देण्यात आले आहेत.

सदरची कारवाई आयुक्त तुकाराम मुंढे, सहआयुक्त (पुणे) दि. वा. भोगावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त साहेबराव देसाई, अन्न सुरक्षा अधिकारी गणेश कदम, मंगेश लवटे यांच्या पथकाने केली.

भेसळयुक्त दुधाचे 556 पॅकेट नष्ट

अहिल्यानगर – अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणी मोहिमेअंतर्गत केडगाव परिसरातील शीतल मिल्क ऍण्ड मिल्क प्रॉडक्स आणि झकास वडापाव सेंटरवर कारवाई करण्यात आली. शीतल मिल्कमधील भेसळीचा संशय असलेले 556 दूध पॅकेट जप्त करून नष्ट करण्यात आले, तर आवश्यक परवाना नसल्याने झकास वडापाव सेंटरचे उत्पादन केंद्र बंद करण्याचे आदेश देण्यात आले. अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त गौरव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी किरण जगदाळे आणि साजिदा मुल्ला यांनी तपासणी केली. शीतल मिल्क येथील दुधाच्या गुणवत्तेबाबत संशय निर्माण झाल्याने 15 हजार 568 रुपये किमतीच्या 556 दुधाच्या बॅग जप्त करण्यात आल्या.