
‘स्वच्छ सर्वेक्षण’ आणि ‘माझी वसुंधरा’च्या बॅनरखाली फोटो काढायचे आणि रात्री कचरा जाळायचा हा महापालिकेचा दुटप्पीपणा आता उघड झाला आहे. शहरापासून 8 कि.मी. अंतरावरील बुरुडगाव कचरा डेपोला 9 जूनपासून लागलेली आग आज 30 दिवसांनंतरही विझलेली नाही. विशेष म्हणजे, मागे चार दिवस पडलेल्या पावसातदेखील ही आग विझलेली नाही. यावरून त्या आगीची भीषणता स्पष्ट होते. 15 या ठिकाणी एकर परिसरात 60-70 फूट उंचीचे कचऱ्याचे ढीग साचले आहेत. अनेक ढीग पेटले आहेत, धगधगत आहेत. त्यातून निघणारा काळा आणि विषारी धूर चाँदबीबी महालावरून 20 कि.मी. दुरूनही दिसत आहे. या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
प्लास्टिकसह कचरा जाळल्याने हवेत कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, सल्फर डायऑक्साइड, हायड्रोजन सायनाइड आणि डायोक्सिनसारखी घातक रसायने सोडली जात आहेत. तज्ञांच्या मते, यामुळे दमा, हृदयविकार, किडनीचे आजार आणि कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात. तरीही येथील कर्मचारी आणि ग्रामस्थांना माहिती दिली नव्हती.
धक्कादायक बाब म्हणजे, डेपोतील कचरा बेकायदा मेंढका नदीच्या पात्रात टाकला जात आहे. आतापर्यंत 300हून अधिक डंपर कचरा येथे टाकण्यात आला आहे. त्यापैकी 200 डंपर कचरा जाळण्यात आला आहे. पावसात ही राख व कचरा वाहत सीना-भीमा-कृष्णा नद्यांतून थेट 2000 कि.मी. दूर बंगालच्या उपसागरात पोहोचणार आहे.
ओला-सुका कचरा वेगळा न केल्याने रिसायकलिंग होतच नाही. शेवटी तो जाळला जातो. गेल्या तीन ते चार वर्षांपासून अनेकदा तक्रारी करूनही घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संदेश कपाळे, मनोज कदम, तुषार लहारे, वसंत कर्डिले, मधुकर टोणे आदी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केला आहे.
या पर्यावरणदृष्टय़ा आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन देत त्वरित आग विझविणे, दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन, स्वतंत्र तज्ञ समिती आणि स्थानिकांना आरोग्य भरपाई मदत देण्याची मागणी केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास राष्ट्रीय स्तरावर प्रदूषण नियामक मंडळाकडे आणि उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशारा ‘आत्मनिर्धार फाउंडेशन’चे अध्यक्ष महादेव गवळी यांनी दिला आहे.
कचरा जाळणे म्हणजे समस्या संपवणे नाही. तो हवा-पाण्यावाटे आपल्या रक्तात मिसळतो. त्याचे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. मात्र, कचरा डेपोला लागणारी आग ही प्रशासन पुरस्कृत आहे की काय? अशी शंका उपस्थित होते. या पर्यावरणीय समस्येकडे गांभीर्याने बघणे आणि त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे.
– अमित गायकवाड, अध्यक्ष, अरण्या फाउंडेशन, अहिल्यानगर





























































