
भाईंदर शहरातील गोविंदनगर परिसरातील अॅक्विरियेस इमारतीत शनिवारी रात्री भीषण आगीची घटना घडली. तळमजल्यावरील विजेचे मीटर पेटल्याने काही क्षणांत आगीचा भडका उडाला. याबाबत माहिती मिळताच अगैिशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला बचावकार्य राबवत इमारतीमध्ये अडकलेल्या १०४ रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. मात्र यातील २१ जण धुरकोंडीमुळे घुसमटले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
मीरा रोड पूर्व येथील गोविंदनगर परिसरातील अक्विरियेस टॉवर सोसायटीच्या तळमजल्यावरील मीटर बॉक्सला शनिवारी रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तत्काळ अग्निशमन विभागाने पाण्याचा मारा सुरू केला. इमारतीमधे अडकलेल्या रहिवाशांना रेस्क्यू करण्यासाठी फायर टीमने इमारतीमध्ये प्रवेश करत १०४ रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले. मात्र यातील २१ जण धुरकोंडीमुळे घुसमटले. धुरामुळे श्वास घेण्यास त्रास झालेल्या २१ रहिवाशांना भाईंदर पश्चिमेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालय आणि हैदरी हॉस्पिटल येथे चार जणांना आणि पूजा हॉस्पिटल येथे एका बाळाला उपचारासाठी दाखल केले. आगीत गुदमरून श्वास घेण्यास त्रास झालेल्या मध्ये ७ महिला, १० पुरुष आणि ४ लहान मुलांचा समावेश आहे. सदर आगीमध्ये २२ ते २५ मीटर व वायर जळाले आहेत.




























































