
कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकमधील तपोवन भागात करण्यात आलेली वृक्षतोड प्रशासकीय चूक असल्याची कबुली मंत्री गिरीश महाजन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली. यावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपसह गिरीश महाजन यांचा खरपूस समाचार घेतला. तपोवनात बेफाम पद्धतीने वृक्षतोड केल्यानंतर आता माफी कशाकरता मागता? असा सवाल राऊत यांनी केला. तसेच महाराष्ट्रातला शतकातील सर्वात मोठा भ्रष्टाचार कुंभमेळ्यात असेल, असा आरोपही राऊत यांनी रविवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना केला.
संजय राऊत म्हणाले, “तपोवनाला हिंदू संस्कृती, रामायण आणि पुराणामध्ये महत्व आहे. प्रभू श्रीरामाच्या वास्तव्याने पवित्र झालेली ही जागा आहे. तपोवनात वृक्षतोड होऊ नये म्हणून आम्ही सगळ्यांनी, पर्यावरण प्रेमींनी वारंवार तिथे आंदोलनं केली. शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे त्या आंदोलनात सहभागी झाले आणि त्यांनीही प्रश्न मांडले. तरीही कुंभमेळ्याचे प्रमुख आणि देवेंद्र फडणवीस यांचे चंपतराय यांनी बेफान पद्धतीने वृक्षतोड केली. त्यानंतर आता माफी कशाकरता मागताय? कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये महाराष्ट्रातला शतकातील सर्वात मोठा भ्रष्टाचार असेल. माझ्याकडे सर्व माहिती आली आहे.”
“कुंभमेळ्यासाठी सर्व ठेकेदार गुजरातचे आलेले आहेत. मुख्य कामांसाठी गुजरातचे ठेकेदार असून छोटीमोठी कामांसाठी भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्याच्यातही मग थोडीफार कमीशनबाजी खाली चालेल. हे काय हिंदू संस्कृतीला किंवा हिंदू धर्माला धरून नाही. जनतेच्या कराचा पैसा असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यापासून भ्रष्टाचार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत त्यात 350 कोटींचा भ्रष्टाचार असून याची सर्व माहिती मी लवकरच तुम्हाला देईल. राम मंदिरापासून काळाराम मंदिर ते कुंभमेळ्यापर्यंत हिंदू धर्माच्या नावाने पैसे खाताय. खरोखर लाज वाटली पाहिजे. असे चंपतराय फक्त अयोध्येमध्ये नसून जिथे भाजपचे राज्य आहे तिथे असे चंपतराय आहेत”, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशवाऱ्या करत असून तिथे मिळणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या पुरस्कारावरून टीकाही होत आहे. यावरूनही संजय राऊत यांनी टीका केली. ईदी अमीन आणि हिटलरच्या युनिफॉर्मवरही सगळ्यात जास्त मेडल्स आहेत. ईदी अमीन, हिटरलर, सद्दाम हुसैनचा फोटो किंवा कोणत्याही हुकुमशाहीचा फोटो काढला तर त्यांच्या युनिफॉर्मवर मेडल लटकत असतात. पाकिस्तानचे जनरल मुनीर यांच्या कपड्यांवरही मेडल असतात, असा टोला राऊत यांनी लगावला.
देशात सध्या काय चाललंय. सोनम वांगचुक गेल्या 14 दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत. हा हिमालयाचा सुपुत्र, पद्मश्री, आंतरराष्ट्रीय किर्तीचे पर्यावरण तज्ज्ञ नीट परीक्षेच्या घोटाळ्याविरुद्ध शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी उपोषणाला बसला आहे आणि सरकार त्यांची साधी दखल घेत नाही. मेडल कसली फिरवता? अण्णा हजारे 11 दिवस उपोषणाला बसले होते. काँग्रेसने धावाधाव करत त्यांचे उपोषण सोडले. अनेक शिष्टमंडळं गेली, केंद्रीय मंत्री गेले. पण सोनम वांगचुकला जंतरमंतरला मरू देण्यासाठी सरकार प्रयत्न करतंय. सरकार लक्ष देत नाही. इतके निर्घृण आणि निर्दयी सरकार जगाच्या इतिहासात झाले नसेल, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

























































