
बंगालच्या उपसागरात रविवारी सकाळी भूकंप झाला. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्याने विशाखापट्टणममधील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेसनुसार, बंगालच्या उपसागरात 4.5 तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली आहे.
न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, हिंदुस्थानी प्रमाण वेळेनुसार, सकाळी 5 वाजून5 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र बंगालच्या उपसागरात काकीनाडा किनाऱ्यापासून सुमारे 225 किलोमीटर अंतरावर 10 किलोमीटर खोलीवर होते.
सुदैवाने, यात कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. शहरातील कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झाले नाही, मात्र रहिवाशांमध्ये घबराट पसरली नाही. भूकंप सौम्य तीव्रतेचा असला तरी, स्थानिक प्रशासनाने रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. भूकंपाच्या धक्क्यानंतर त्सुनामी किंवा इतर कोणत्याही मोठ्या धोक्याची तात्काळ शक्यता नाही. सध्या शहरातील परिस्थिती पूर्णपणे सामान्य असून जनजीवन पूर्ववत होत आहे.
























































