राजकीय हित साध्य झाले, आता लाडक्या बहिणींना विसरले! विजय वडेट्टीवार यांचा महायुती सरकारवर घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांनी लाडकी बहीण योजना आणली आणि निवडणुकांपूर्वी लाडक्या बहिणींना सरसकट पैसे दिले. यानंतर अनेक निकषांच्या आधारे लाखो महिलांना यातून वगळ्यात आले. आता पुन्हा एकदा सरकारने 92 लाखांहून जास्त महिलांना या योजनेतून वगळल्याची माहिती आहे. यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकार ताशेरे ओढले आहेत. राजकीय हित साध्य झाले आता लाडक्या बहिणींना विसरले असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला.

विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट शेअर करत सरकारवर निशाणा साधला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘लाडकी बहीण’ योजनेचा मोठा गाजावाजा करत महिलांना डोक्यावर घेणाऱ्या महायुती सरकारने सत्ता मिळताच महिलांना योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे. राजकीय स्वार्थ साधल्यानंतर आता तब्बल 92 लाख महिलांना या योजनेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला असून, हा महिलांचा मोठा विश्वासघात आणि राजकीय स्वार्थाचा कळस आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

 

विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारच्या हेतूवर आणि नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सत्ता मिळवण्यासाठी कोणतीही शहानिशा न करता आधी सरसकट लाभ वाटण्यात आला, मात्र आता निवडणूक संपून सत्ता हातात येताच वेगवेगळे निकष लावून महिलांना अपात्र ठरवले जात असल्याचा दावा त्यांनी केला. जर त्या महिला अपात्र होत्या, तर त्यांना आधी लाभ का देण्यात आला? आणि जर त्या पात्र होत्या, तर आता त्यांना वगळण्याचे कारण काय? या योजनेवर आतापर्यंत तब्बल 14 हजार कोटी रुपयांचा खर्च झाला असून या पैशांच्या नियोजनातील गोंधळ, चुकीचे निकष आणि राजकीय फायद्यासाठी केलेल्या निर्णयांचा हिशोब कोण देणार, असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला.

महायुती सरकारने महिलांच्या भावनांशी खेळ करून, त्यांच्या नावावर राजकारण केले आहे आणि सत्ता मिळताच त्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम केले आहे. त्यामुळे ही योजना लाडक्या बहिणींसाठी नव्हे, तर केवळ मतांसाठीच होती का? हा प्रश्न आज राज्यातील प्रत्येक महिलेच्या मनात निर्माण झाला आहे, असे वडेट्टीवार यांनी आपल्या X पोस्टमध्ये म्हटले आहे.