धावत्या ट्रेनमध्ये केली पूजा, व्हिडीओ व्हायरल होताच रेल्वे प्रशासनाने दिले स्पष्टीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी ‘नंदिग्राम एक्स्प्रेस’मधील फर्स्ट एसी कोच ‘हनिमून सूट’ सारखा सजवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर आता आणखी व्हिडीओ समोर आला आहे. एका धावत्या ट्रेनमध्ये पुजारी पूजा करतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले असून रेल्वेला यावर स्पष्टीकरण दिले आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक पुजारी ट्रेनच्या डब्यात खाली बसून पूजा करताना दिसत आहे, तर सफेद कपडे घातलेले काही भाविक या पूजेत सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे. धावत्या ट्रेनमध्ये हा धार्मिक विधी सुरू असल्याचे दिसल्यामुळे नेटकऱ्यांमध्ये वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वेने पोस्ट शेअर करत याप्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. ही पूजा कोणत्याही पॅसेंजर कोचमध्ये झालेली नाही. हा डबा एका ग्रुपने भाड्याने घेतलेला ‘सलोन कार’ (Saloon Car) म्हणजेच विशेष व्हीआयपी डबा होता. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, एका ग्रुपने 8 जुलै रोजी आयआरसीटीसी (IRCTC) मार्फत 3,08,580 रुपये भरून हा डबा बुक केला होता. हा डबा 10 जुलै रोजी नवी दिल्ली ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या ‘पश्चिम एक्सप्रेस’ला जोडण्यात आला होता, ज्यामध्ये हा विधी करण्यात आला.

ट्रेनमधील या पूजेमुळे कोणत्याही सामान्य प्रवाशाला त्रास झालेला नाही किंवा रेल्वेच्या सुरक्षेचे नियम मोडले गेलेले नाहीत, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

रेल्वेच्या डब्याला बनवले हनिमून सूट! टीसी निलंबित; डेकोरेटरवर गुन्हा दाखल