रेल्वे प्रवाशांचा बेडशीट, उशी आणि टॉवेलवर डल्ला; 104 कोटी रुपयांचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय रेल्वेच्या वातानुकूलित (एसी) डब्यांमध्ये प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या बेडरोल संचातील वस्तूंच्या चोरीचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढल्याचे समोर आले आहे. कोविड-19 महामारीनंतर जानेवारी 2022 मध्ये बेडरोल सेवा पूर्ण क्षमतेने पुन्हा सुरू झाल्यानंतर मे 2026 पर्यंत तब्बल 1.27 कोटी बेडरोलमधील वस्तू चोरीला गेल्याची नोंद झाली आहे. या चोरीमुळे बेडरोल पुरवठादार कंत्राटदारांचे 104.51 कोटींचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

द इंडियन एक्स्प्रेसने माहितीच्या अधिकार (RTI) अंतर्गत भारतीय रेल्वेच्या 69 विभागांकडे माहिती मागवली होती. त्यापैकी 18 रेल्वे विभागीय क्षेत्रांतील 16 झोनमधील 54 विभागांनी माहिती उपलब्ध करून दिली. या आकडेवारीनुसार 2022 ते 2025 या कालावधीत बेडरोल चोरीच्या घटनांमध्ये 56 टक्क्यांची वाढ झाली आहे.

भारतीय रेल्वेच्या एसी डब्यांमध्ये प्रत्येक प्रवाशाला दोन बेडशीट, एक उशी, उशीचे कव्हर, एक ब्लँकेट आणि चेहरा पुसण्यासाठी टॉवेल असा बेडरोल संच दिला जातो. मात्र, दर 1,000 प्रवाशांमागे किमान एक प्रवासी या संचातील एखादी वस्तू सोबत घेऊन जात असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

चोरीला जाणाऱ्या वस्तूंमध्ये चेहरा पुसण्यासाठीचा टॉवेल सर्वाधिक पसंतीचा ठरला आहे. गेल्या चार वर्षांत 46.54 लाख टॉवेल चोरीला गेले. त्यानंतर 41.13 लाख बेडशीट, 23.59 लाख उशीचे कव्हर आणि 12.95 लाख ब्लँकेट गायब झाल्याची नोंद आहे. सर्वात कमी चोरी झालेली वस्तू म्हणजे उशी असून, चार वर्षांत 2.76 लाख उशा चोरीला गेल्या.

विभागनिहाय आकडेवारी पाहता बीकानेर रेल्वे विभागात सर्वाधिक 25.76 लाख वस्तू चोरीला गेल्या आहेत. त्यानंतर रांची विभागात 9.31 लाख, दिल्लीत 8.21 लाख, मुंबईत 8.17 लाख, जोधपूरमध्ये 8.09 लाख आणि अहमदाबादमध्ये 6.94 लाख वस्तू चोरीला गेल्याची नोंद आहे.

रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही बाब “गंभीर चिंतेची” असल्याचे मान्य केले आहे. प्रवाशांकडून होणारी बेडरोल चोरी रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असून, अशा प्रकारात सहभागी होणाऱ्यांवर कारवाई करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले की, प्रत्येक डब्यातील बेडरोलचा हिशेब ठेवण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदार संस्थेची असते. एखादी वस्तू कमी आढळल्यास त्याची आर्थिक जबाबदारीही संबंधित संस्थेलाच उचलावी लागते. चोरीमुळे होणारी कमतरता भरून काढण्यासाठी अतिरिक्त बेडरोल संच उपलब्ध करून द्यावे लागत असल्याने कंत्राटदारांवरील आर्थिक भार वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले.

भारतीय रेल्वे दररोज लाखो प्रवाशांना बेडरोलची सुविधा उपलब्ध करून देते. त्या तुलनेत चोरीचे प्रमाण कमी वाटत असले तरी, सार्वजनिक मालमत्तेबाबत प्रवाशांची निष्काळजी वृत्ती आणि नागरी जबाबदारीकडे होणारे दुर्लक्ष या घटनांमधून स्पष्ट होत असल्याची टिप्पणीही या अहवालात करण्यात आली आहे.