मोठी नावेही उघड होतील, कोणालाही सोडणार नाही; राम मंदिर देणगी घोटाळाप्रकरणी संतोष दुबेंकडून SIT कडे कागदपत्रे सादर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येतील राम मंदिरातील देणगी घोटाळाप्रकरणी SIT तपास करत आहे. श्री राम जन्मभूमी ट्रस्टचे माजी महासचिव चंपत राय यांचे निकटवर्ती टिन्नू यादव यांच्यासह आठ आरोपी देणगी घोटाळा प्रकरणात तुरुंगात आहेत. या प्रकरणाचा तपास करणारी एसआयटी पैशांच्या व्यवहारांचा तपास करत असून, माजी कारसेवक संतोष दुबे यांनी सोमवारी राम मंदिरातील देणगी चोरीसंदर्भात नवीन पुरावे SIT ला सादर केले.

या प्रकरणात मोठी नावेही उघड होतील, कोणालाही सोडले जाणार नाही, असे सांगत संतोष दुबे यांनी देणगी घोटाळा प्रकरणी एसआयटीकडे कागदपत्रे सादर केली. राम मंदिरातील देणगी घोटाळाप्रकरणी तपास करणाऱ्या एसआयटीने आता तपासाला गती दिली आहे. एसआयटीने देणगी घोटाळा मुद्द्यावर आवाज उठवणाऱ्या माजी कारसेवक संतोष दुबे यांची चौकशी केली.

संतोष दुबे सोमवारी अयोध्या सीओच्या कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी राम मंदिरातील देणगी घोटाळ्याबाबत पुरावे सादर केले. संतोष दुबे यांनी सांगितले की, या पुराव्यांमुळे देणगी चोरणाऱ्यांच्या अडचणी वाढतील. संतोष दुबे यांनी सांगितले की, एसआयटीने एक दिवस आधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देणगी चोरीसंदर्भात त्यांची चौकशी केली होती. त्यांनी पुढे सांगितले की, एसआयटी त्यांच्या जबाबांचा आणि पुराव्यांचाही तपासात समावेश करत आहे.

एसआयटीने सर्व पुरावे सीओच्या कार्यालयात सादर करण्यास सांगितले होते. त्यामुळेच ते पुरावे सादर करण्यासाठी सीओच्या कार्यालयात गेले होते. सीओच्या कार्यालयातून एसआयटीकडे पुरावे सुपूर्द केले जातील. त्यांनी दावा केला की, यात अनेक मोठी नावेही उघड होणार आहेत. कोणालाही सोडले जाणार नाही.