श्री विठ्ठल-रखुमाईचे उद्यापासून 24 तास दर्शन, वारकऱ्यांच्या सुविधेसाठी मंदिर समिती सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आषाढी वारीसाठी येणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिर समितीने शुक्रवारपासून (दि. 16) श्री विठ्ठल-रखुमाईचे दर्शन 24 तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.

आषाढी यात्रा कालावधी 15 ते 29 जुलै असा आहे. या कालावधीत सुमारे 18 ते 20 लाख भाविक येण्याची शक्यता असून, यात्रा कालावधीत दर्शन रांगेतील भाविकांना आवश्यक त्या सोयी-सुविधा मंदिर समिती मार्फत उपलब्ध करून देण्यासाठी व्यवस्थापनाची जय्यत तयारी सुरू आहे. परंपरेप्रमाणे 16 जुलै रोजी श्रींचा पलंग काढून 3 ऑगस्टपर्यंत 24 तास दर्शन व्यवस्था सुरू ठेवण्यात येणार आहे. यात्रेदरम्यान पदस्पर्श दर्शन 22 तास 15 मिनिटे, तर मुखदर्शन 24 तास उपलब्ध राहणार आहे.

आषाढी शुद्ध एकादशीला पहाटे 2.20 वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न होणार आहे. आषाढी यात्रा कालावधीत समितीमार्फत दर्शनरांगेत बॅरीकेटिंग करून त्यावर ताडपत्री शेड, जादा पत्राशेडची निर्मिती, विश्रांती कक्ष, फॅब्रिकेटेड शौचालये, बसण्याची सुविधा, लाईव्ह दर्शन, कुलर-फॅन, मिनरल वॉटर आदी सुविधा उपलब्ध राहणार आहेत.

भाविकांच्या सुविधेसाठी दर्शनरांग व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यात आले असून, श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडपातील आठ गाळ्यांपैकी दोन गाळ्यांचा वापर करण्यात येणार आहे. दर्शन मंडप ते कासार घाटपर्यंत स्कायवॉक उभारण्यात येत आहे. लक्ष्मण पाटील मंदिर ते गोपाळपूरपर्यंत दर्शनरांगेत तीन ठिकाणी अतिरिक्त पत्राशेड उभारण्यात येणार असून, पदस्पर्श दर्शनासाठी श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप ते स्वेरी कॉलेज, गोपाळपूरपर्यंत सुमारे सहा किलोमीटर लांबीची दर्शनरांग राहणार आहे.

यात्रा निर्विघ्न, सुरक्षित व यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य आमदार रामचंद्र कदम, शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, भास्करगिरी बाबा, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ऍड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्र्ााr भगरे गुरुजी, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, प्रणिता भालके, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक प्रवीणकुमार घम, लेखाधिकारी मुकेश अनेचा; तसेच मंदिर समितीचे सर्व विभागप्रमुख, कर्मचारी, स्वयंसेवक आणि सर्व संबंधित यंत्रणा समन्वयाने परिश्रम घेत आहेत.

पाच-सहा ठिकाणी मोबाईल लॉकर

मंदिरात मोबाईल व कॅमेरा नेण्यास बंदी असल्यामुळे पाच ते सहा ठिकाणी मोबाईल लॉकर सुविधा उपलब्ध राहील. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, श्री संत तुकाराम भवन व श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास येथे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार असून, भाविकांसाठी बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद अल्प दरात उपलब्ध राहील. चंद्रभागा नदीपात्रात चेंजिंग रूम, दर्शनरांगेत हिरकणी कक्ष तसेच आषाढी एकादशीनिमित्त मंदिरात विशेष फुलांची सजावट करण्यात येणार आहे.