
NEET पेपर फुटीं प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी दिल्ली येथील जंतर मंतरवर आमरण उपोषण सुरू केलेले सोनम वांगचूक यांना कोल्हापुरातून इंडिया आघाडीने पाठिंबा जाहीर केला आहे. छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारकस्थळी बुधवारी इंडिया आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.
नीट परीक्षा पेपर फुटीची जबाबदारी स्विकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या प्रमुख मागणीसाठी दिल्ली येथील जंतर मंतरवर जनआंदोलन सुरु आहे. सोनम वांगचूक हे गेली १७ दिवस तेथे आमरण उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती खालावत असताना, मोदी सरकारने या आंदोलनाची कोणतीही दखल घेतली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आंदोलन हुकुमशाही पध्दतीने मोडण्याचा प्रयत्न करत आहेत. देशातील सर्व राज्यातून विद्यार्थी विद्यार्थीनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर बुधवारी राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारकस्थळी सोनम वांगचूक यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा म्हणून इंडिया आघाडीकडून सकाळी ११ ते १२ या वेळेत धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सोनम वांगचूक तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है या घोषणानी परिसर दणाणून गेला.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे म्हणाले,केंद्र सरकार लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे निघाले असून विद्यार्थी चळवळ दडपण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे येथील युवकांनी दुसऱ्या स्वातंत्र्य लढाईस सज्ज रहावे, असे आवाहन केले. कॉ. उदय नारकर यांनी चळवळ कितीही दडपली तरी ती मोठया जोमाने उफाळून येईल व मोदी सरकारला जाग आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा दिला. यावेळी भरत रसाळे, तेजस्विनी देसाई, डी.जी.भास्कर,दिलीप पोवार,रघुनाथ कांबळे,विवेकानंद गोडसे,सुभाष देसाई,जीवन बोडके,शुभम शिरहट्टी,रसिया पडळकर,डॉ.सानिका सावंत,हसन देसाई,दिलदार मुजावर, सुधीर हंजे,गजानन देशमुख,संजय पाटील आदी उपस्थित होते.


























































