
मराठी रंगभूमीने काळानुसार स्वतःमध्ये सातत्याने बदल स्वीकारले आहेत. सामाजिक, ऐतिहासिक, संगीतप्रधान, प्रायोगिक, विनोदी अशा विविध प्रवाहांतून ती अधिक समृद्ध होत गेली. आता या रंगभूमीने डिजिटल युगातील सर्वाधिक प्रभावी माध्यम असलेल्या ‘कंटेंट क्रिएटर्स’नाही कवेत घेतले आहे. समीर खांडेकर लिखित आणि दिग्दर्शित ‘बनवाबनवी’ हे नाटक या बदलत्या काळाचे प्रतिनिधित्व करणारा एक धाडसी आणि वेगळा प्रयोग ठरतो आहे.
हॉरर आणि कॉमेडी या दोन परस्परविरोधी वाटणाऱ्या भावविश्वांचा मिलाफ मराठी रंगभूमीवर क्वचितच पाहायला मिळतो. ‘बनवाबनवी’ या जॉनरमध्ये भर घालते. एका तरुणाचं लग्न ठरलंय आणि म्हणून तो आणि त्याचे काही मित्र एका आलिशान व्हिलामध्ये बॅचलर पार्टीसाठी एकत्र येतात. धमाल, मस्करी आणि गोंधळाने सुरू झालेला हा प्रवास अचानक भयाच्या वळणावर येतो. तो व्हिला झपाटलेला असल्याचे समजताच पुढे उलगडणारे प्रसंग प्रेक्षकांना कधी खळखळून हसवतात, तर कधी दचकवून खुर्चीच्या कडेला बसायला भाग पाडतात. भय आणि विनोद यांचा समतोल राखत कथानक पुढे सरकते आणि एखाद्या सौम्य सूडकथेप्रमाणे त्याचा सुखान्त होतो. या कथेला छोट्याशा रहस्याची डूब असली तरीही विनोद आणि भय हे मुख्य स्थायीभाव आहेत. तसंच सोशल मीडियावर यशस्वी म्हणवल्या जाणाऱ्या कंटेंट क्रिएटर्सची मेहनत, त्यांची दुःखं आणि त्यांच्यावरच्या मानसिक दबावाची इथे जाणीव करून देण्यात आली आहे.
या नाटकाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेले मराठी कंटेंट क्रिएटर्स प्रथमच व्यावसायिक रंगभूमीवर एकत्र आले आहेत. कलाकारांची मूळ नावेच त्यांनी साकार केलेल्या पात्रांना दिल्याने प्रेक्षकांचा तो कनेक्ट कायम राहतो. मोबाईलच्या छोट्या पडद्यावर काही सेकंदांत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी ही मंडळी जेव्हा रंगमंचावर दोन-अडीच तास प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे आव्हान स्वीकारतात, तेव्हा तो केवळ प्रयोग राहत नाही, तर नव्या पिढीचा रंगभूमीशी जोडला जाण्याचा तो एक महत्त्वाचा दुवा होतो. मराठी नाटक सर्वार्थाने समृद्ध असलं तरी महाविद्यालयीन तरुणांना खेचून आणतील अशी नाटके अभावानेच आढळतात. बनवाबनवी ती उणीव भरून काढण्याचा प्रयत्न करते आणि तो बऱ्याच अंशी यशस्वी झाला आहे.
या नाटकाच्या निर्मितीमागची कहाणीही तितकीच रंजक आहे. समीर खांडेकर एका वेगळ्या प्रोजेक्टच्या बैठकीसाठी कॉफी शॉपमध्ये गेले होते. तो प्रकल्प झाला नाही; मात्र तिथेच प्रभात थिएटर्सचे निर्माते हर्षद कठापूरकर यांनी त्यांच्यासमोर ‘बनवाबनवी’ लिहिण्याचा प्रस्ताव ठेवला. गंमत म्हणून दिलेला होकार पुढे त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रवासाची सुरुवात ठरला. विशेष म्हणजे मुहूर्ताच्या दिवशी त्यांच्यासमोर फक्त एक कोरा कागद आणि त्यावर लिहिलेले ‘बनवाबनवी’ हे नाव, एवढेच होते. कथा नव्हती, पात्रे नव्हती, संवाद नव्हते. केवळ कल्पना आणि ती सत्यात उतरवण्याची जिद्द होती. लेखक-दिग्दर्शक म्हणून ही अत्यंत धाडसी सुरुवात होती. आजच्या काळात बहुतांश नाटके पूर्ण संहितेसह रंगमंचावर येतात; मात्र येथे संपूर्ण विश्व शून्यातून उभे राहिले.
सुमारे साठ दिवसांच्या तालमींमध्ये या कंटेंट क्रिएटर्सनी स्वतःला पूर्णपणे रंगभूमीच्या शिस्तीत झोकून दिले. लाखो लोकांचे मनोरंजन करणारे हे डिजिटल कलाकार पुन्हा एकदा विद्यार्थी झाले होते. संवादफेक, रंगमंचावरील हालचाली, टायमिंग, समूह अभिनय अशा प्रत्येक बाबतीत त्यांनी मेहनत घेतली, जी आपल्याला रंगमंचावर दिसते. समीर खांडेकर यांच्यासाठीही हा अनुभव वेगळा होता. या कलाकारांच्या विनोदाची शैली पारंपरिक रंगभूमीपेक्षा भिन्न असल्याने त्यांनी लेखन आणि दिग्दर्शनातही त्या शैलीचा जाणीवपूर्वक समावेश केला. त्यामुळे नाटकाला आधुनिक, ताजेतवाने आणि डिजिटल पिढीला जवळचे वाटणारे स्वरूप मिळाले. विनोद तरुणाईचा असला तरी तो बऱ्यापैकी स्वच्छ आणि कौटुंबिक आहे. प्रकाशयोजना आणि संगीत हे अशा प्रकारच्या नाटकातील महत्त्वाचे घटक असतात आणि दोन्हीकडे उत्तम कामगिरी झाली आहे. मराठी भाषेवर थोडे अधिक लक्ष हवे. काही उणिवा जरूर आहेत. मात्र संपूर्ण टीमने त्याचा नीट विचार करून त्यावर काम केले तर हा प्रयोग अधिक चुस्त होऊ शकेल. सर्वच कलाकारांनी आपली कामे मनापासून करण्याचा प्रयत्न केला आहे, तरी त्यात काही सुधारणा अपेक्षित आहेत. शंतनू रांगणेकर हा हरहुन्नरी कलावंत या रंगभूमीला लाभला आहे. तो भविष्यात अजून चमकदार कामगिरी करून दाखवेल.
प्रभात थिएटर्सचे निर्माते निखिल करंडे आणि हर्षद कठापूरकर यांनी या प्रयोगाला दिलेले स्वातंत्र्यही उल्लेखनीय आहे. नव्या कलाकारांवर, नव्या संकल्पनेवर आणि लेखक-दिग्दर्शकाच्या दृष्टीवर त्यांनी दाखवलेला विश्वास हा अशा प्रयोगांच्या यशामागील महत्त्वाचा घटक असतो. ‘बनवाबनवी’चे सर्वात मोठे यश मात्र तिकीट खिडकीपलीकडे आहे. या नाटकाचा जवळपास सत्तर टक्के प्रेक्षक आयुष्यात पहिल्यांदाच नाटक पाहण्यासाठी नाट्यगृहाकडे आला आहे, असे समीर खांडेकर सांगतात. ते कदाचित त्यांच्या आवडत्या कंटेंट क्रिएटरला पाहण्यासाठी आले असतील; पण त्या निमित्ताने त्यांची नाळ मराठी रंगभूमीशी जोडली जात असेल तर त्याहून मोठे यश कोणते?
मराठी नाटकांसमोर आज नव्या प्रेक्षकांना आकर्षित करण्याचे मोठे आव्हान आहे. अशा वेळी डिजिटल माध्यमातील लोकप्रिय चेहऱ्यांच्या माध्यमातून तरुण पिढीला नाट्यगृहात आणण्याचा हा प्रयत्न निश्चितच स्वागतार्ह आहे. ‘बनवाबनवी’ केवळ हॉरर-कॉमेडी नाटक नाही; तर परंपरागत रंगभूमी आणि डिजिटल पिढी यांच्यातील दुवा निर्माण करणारा एक महत्त्वाचा सांस्कृतिक प्रयोग आहे. मनोरंजनाबरोबरच रंगभूमीला नवे प्रेक्षक मिळवून देण्याची ताकद या प्रयोगात दिसते आणि म्हणूनच ‘बनवाबनवी’ ही आजच्या मराठी रंगभूमीवरील एक लक्षवेधी घटना ठरते.
-
लेखक / दिग्दर्शक: समीर खांडेकर
-
कलाकार: सुमित चव्हाण, ऋषभ मोरे, सोनाली गुरव, सुधाकर सोनवणे, ओमकार कदम, सिद्धी पोतदार आणि शंतनू रांगणेकर
-
नेपथ्य: डॉ. सुमित पाटील
-
प्रकाश: चेतन पडवळ
-
संगीत: निनाद म्हैसाळकर
-
वेशभूषा: चारुल देशपांडे
-
निर्माते: ज्योती कठापूरकर, निखिल करंडे
-
सहनिर्माती: प्रियांका जोगी
-
सूत्रधार: दीपक गोडबोले
-
छायाचित्र सौजन्य: संजय पेठे





























































