
आषाढी एकादशीनिमित्त ‘वीर सेनानी फाऊंडेशन’ आणि ‘स्वरनिनाद फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भक्तिरस – एक विठ्ठलमयी स्वरवंदना’ या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभादेवीच्या रवींद्र नाट्यमंदिरात शनिवार, २५ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता ही आध्यात्मिक मैफल रंगणार आहे. हिंदुस्थानी संत परंपरा, अभिजात संगीत आणि राष्ट्रभक्तीचा संगम या मैफलीतून अनुभवता येणार आहे.
दिग्गज शास्त्रीय गायक पं. व्यंकटेश कुमार व डॉ. भरत बलवल्ली हे या मैफलीत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत चोखामेळा, संत कनकदास, संत बसवण्णा, संत पुरंदरदास, कबीर, मीराबाई आदी संतांच्या निवडक आणि दुर्मिळ रचना सादर करणार आहेत. सूत्रसंचालन कीर्तनकार डॉ. चारुदत्त आफळे हे करणार असून पं. मकरंद कुंडले (ऑर्गन), अमर ओक (बासरी), दादा परब (पखवाज), मंदार गोगटे (साईड रिदम्स) आणि रामकृष्ण करंबेळकर (तबला) यांची साथसंगत लाभणार आहे. कार्यक्रमाची तिकिटे सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत हॉलवर उपलब्ध आहेत. घरपोच तिकीट सुविधाही उपलब्ध आहे. फोनद्वारे बुकिंगसाठी शैलेश सामंत (९८१९९६५४४४ / ९८३३५१७५०१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वीरपत्नींचा सन्मान करण्यात येणार
देशासाठी बलिदान दिलेल्या हिंदुस्थानी सशस्त्र दलातील शहीद जवानांच्या वीरपत्नींचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात येणार आहे. पतीच्या बलिदानानंतर धैर्याने जीवन जगणाऱ्या वीरांगनांना सॅल्युट करण्याचा हा नम्र प्रयत्न आहे. वीर सेनानी फाऊंडेशन आणि एंटॉड फार्मास्युटिकल्स यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.





























































