रिपरिप टिपटिप बरसत माझा श्रावण आला! नंदेश उमप यांचे रोमँटिक ‘पाऊस’ गीत प्रदर्शित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाऊस आणि आठवणी यांचं एक अतूट नातं आहे. ढग दाटून आले की मनात आठवणींचे मळभही आपोआप दाटून येतात. जुन्या आठवणींना उजाळा देणारे रोमँटिक ‘पाऊस’ हे गीत नुकतेच आघाडीच्या म्युझिक प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहे.

‘रिपरिप टिपटिप बरसत माझा श्रावण आला, मेघाअमृतसम बरसत माझा साजन आला…’ असे या गाण्याचे बोल आहेत. पोवाडा, गवळण, गोंधळ, कोळीगीत अशा लोकगीतांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे गायक नंदेश उमप यांनी या गाण्याला स्वरसाज चढवला आहे. गायन, गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन अशा तिन्ही जबाबदाऱ्या नंदेश उमप यांनीच सांभाळल्या असून म्युझिक अरेंजमेंट सत्यजित जामसंडेकर यांची आहे.

या गाण्याबद्दल नंदेश उमप म्हणाले, ‘गझल, भावगीत तुमच्या आवाजात ऐकायला आवडेल, असा प्रेक्षकांचा नेहमी आग्रह असायचा. ‘पाऊस’ या गाण्याच्या निमित्ताने मी माझ्या नेहमीच्या शैलीपेक्षा थोडा हटके प्रयत्न केला आहे. मनाला चिंब करणारे हे रोमँटिक गीत प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. आई-वडिलांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांना हे गाणे मी समर्पित करतो.’