इथेनॉलयुक्त पेट्रोलने कार बिघडली, कंपनीला नवी कार देण्याचे आदेश; कोर्टाने दंडही ठोठावला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इथेनॉलमिश्रित (ई-20) पेट्रोलमुळे कार बिघडल्याने केलेल्या तक्रारीनंतर रायपूरच्या ग्राहक न्यायालयाने मारुती सुझुकी कंपनीला दंड ठोठावत ग्राहकाला नवीन कार देण्याचे आदेशही दिले आहेत. यामुळे आधीच इथेनॉलमिश्रित पेट्रोलला ग्राहकांचा विरोध होत असताना आता न्यायालयाच्या निर्णयामुळे इथेनॉलच्या वापराबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

रायपूरमधील डॉक्टर प्रेमराज देब्ता यांनी 3 जून 2024 रोजी मारुती सुझुकीची एक कार नेक्सा डीलरशीप येथून खरेदी केली होती. कार खरेदी केल्यानंतर काही दिवसांत ती अचानक बंद पडू लागली. ज्या वेळी कारला सर्व्हिस सेंटरला नेण्यात आले त्या वेळी सांगितले की, कारमध्ये असलेले पेट्रोल कुठल्या तरी पदार्थाने मिश्रित आहे. वारंवार गाडी बंद पडणे आणि सर्व्हिस सेंटरला चकरा मारून परेशान झालेल्या डॉक्टरने सरकारी लॅबमध्ये पेट्रोलची तपासणी केली तर पेट्रोलमध्ये इथेनॉल असल्याचे स्पष्ट झाले होते.

कंपनी म्हणते

कार कंपनीच्या पॉलिसीनुसार पेट्रोलच्या गुणवत्तेमुळेच गाडीत बिघाड झाला आहे. जे एक बाहेरचे कारण आहे. जर बाहेरच्या कारणामुळे गाडी खराब झाली तर ते वॉरंटीच्या कक्षेत येत नाही, असा कंपनीने ग्राहक न्यायालयापुढे युक्तिवाद केला, परंतु कंपनीचा दावा चुकीचा असल्याचे ग्राहक न्यायालयाने म्हटले.

कोर्टाचे आदेश

न्यायालयाने कंपनीला निर्देश दिले की, 45 दिवसांत त्याच मॉडलची नवी कार ई-20 इंधनवर चालणारी द्यावी. जर कार दिली नाही तर कारची किंमत, आरटीओची फी, इन्शुरन्स प्रीमियमसोबत 20 लाख 50 हजार 494 रुपये द्यावे लागतील. तसेच मानसिक त्रास झाल्याबद्दल ग्राहकाला एक लाख रुपये आणि कोर्टाचा खर्च म्हणून अतिरिक्त 10 हजार रुपये द्यावे लागतील.