
गरीब नगरमधील काही झोपडीधारकांचे पुनर्वसन झाले होते, मात्र ते घर भाडय़ाने देऊन लोक पुन्हा गरीब नगरमध्ये राहत होते, असा दावा करणारे प्रतिज्ञापत्र रेल्वेने उच्च न्यायालयात सादर केले आहे. गरीब नगरमध्ये करण्यात आलेली कारवाई ही नियमानुसारच केल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
पश्चिम रेल्वेच्या सहाव्या मार्गिकेसाठी गरीब नगरमधील झोपडय़ांवर कारवाई करण्यात आली. येथे तब्बल 600 अनधिकृत झोपडय़ा होत्या. यामध्ये सुमारे दीड हजार नागरिक वास्तव्यास होते. या बेकायदा झोपडय़ांवर कारवाई करण्यात आली. येथील 100 झोपडय़ा अधिकृत आहेत. त्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे, असे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. येथील काही झोपडीधारकांचे 2017 मध्ये पुनर्वसन करण्यात आले होते. ते घर भाडय़ाने देऊन काही लोक पुन्हा गरीब नगरमध्ये राहायला आले होते. अशा झोपडय़ांवरदेखील कारवाई करण्यात आली. नियमानुसार ही कारवाई झाली आहे, असा दावा रेल्वेने केला आहे.
वांद्रे (पूर्व) गरीब नगर येथील झोपडय़ा हटवताना कोणत्याही झोपडीधारकाच्या मौल्यवान वस्तूंचे नुकसान होणार नाही याची काळजी कारवाई करताना घेण्यात आली. या कारवाईसाठी एक हजार पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला होता, असे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.
व्यावसायिक गाळय़ात भाडेकरू
येथील काही झोपडय़ांमध्ये व्यावसायिक गाळे होते. या गाळय़ांमध्ये भाडेकरू होते. काही जणांनी मालक असल्याचा बनाव केला. प्रत्यक्षात ते तेथे राहत नव्हते, असे रेल्वेने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

































































