
आषाढी वारीत भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात 15 जुलैपासून ‘व्हीआयपी’ दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. मात्र, त्यांच्या या निर्णयाला पहिल्याच दिवशी हरताळ फासण्यात आला. बुधवारी शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांसह थेट गाभाऱ्यात दर्शन घेतले. दुसरीकडे मात्र भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दर्शनरांगेत उभे राहून दर्शन घेतले.
मंत्री गुलाबराव पाटील पंढरपुरात आल्यानंतर त्यांना प्रशासनाच्या माध्यमातून थेट मंदिरात नेऊन विशेष दर्शन देण्यात आले. यासंदर्भातील काही व्हिडीओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणात व्हायरल झाली असून, त्यावरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून ‘व्हीआयपी’ दर्शनबंदीचा निर्णय सर्वांसाठी समान असावा आणि त्यात कोणालाही अपवाद नसावा, अशी मागणी होत आहे.
‘शॉर्टकट’ दर्शनाचा प्रयत्न केल्यास गुन्हा दाखल होणार
पहिल्याच दिवशी मंदिरात ‘व्हीआयपी’ दर्शनावरून गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर ‘शॉर्टकट’ अथवा नियमबाह्य मार्गाने दर्शन घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर ‘आपत्कालीन’ कायद्याअंतर्गत थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिला आहे. राज्यातील मंत्री, आमदार व खासदार यांच्यासोबत केवळ दोन पिंवा तीन व्यक्तींनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

























































