
देशात बजबजपुरी माजली आहे. कायदा, सुव्यवस्था नावालाही शिल्लक राहिली नाही. राज्यकर्ते बेगुमान आणि पोलीस बेमुर्वत असल्यावर राज्यात देव तरी कसे सुरक्षित असतील? बजाजनगरमधील श्री स्वामी समर्थ मंदिरातील चांदीच्या पादुका, दानपेट्या, सोन्याची साखळी चोरट्यांनी लंपास केली. एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या स्वामी समर्थ मंदिरावर पडलेल्या या डाक्यामुळे भाविकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आंबेडकर चौकात श्री स्वामी समर्थ मंदिर आहे. बुधवारी रात्री मंदिराच्या मुख्य दरवाज्याचे कुलुप तोडून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला. मंदिरात ठेवण्यात आलेल्या दोन दानपेट्या फोडून त्यातील जवळपास एक लाखाची रक्कम चोरट्यांनी काढून घेतली. त्यानंतर स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर ठेवण्यात आलेल्या दीड किलो वजनाच्या चांदीच्या पादुका आणि स्वामींच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरट्यांनी पळवली.
सकाळी साडेसहा वाजता साफसफाई करण्यासाठी शरद मंचकराव पतंगे आला. त्यावेळी हा चोरीचा प्रकार उघड झाला. शरद पतंगे याने श्री स्वामी समर्थ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संतोष कृष्णराव पाटील तसेच पदाधिकारी हर्षल बेंडाळे, गोपाळ पाटील आणि नरसिंह राऊत यांना माहिती दिली. ट्रस्टचे सर्व पदाधिकारी तात्काळ मंदिरात आले. ट्रस्टचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरट्यांनी सीसीटीव्ही डीव्हीआरच पळविला
श्रीस्वामी समर्थ मंदिरात ट्रस्टच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामुळे हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असावा. त्यामुळे आपले बिंग फुटेल या भीतीने चोरट्यांनी कॅमेऱ्याचा डीव्हीआरच पळविला. त्यामुळे तपास कसा करायचा, असा प्रश्न पडल्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी सांगितले.
डीबी पथक बुडाले वसुलीच्या सागरात!
एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या बेबंद कारभाराचा फटका बजाजनगरवासीयांना बसत आहे. या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात गुन्हयांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. वरिष्ठांच्या मर्जीतील अधिकाऱ्याच्या हातात असलेले पोलीस ठाण्याचे डीबी अर्थात गुन्हे प्रकटीकरण पथक काय करते, असा प्रश्न निर्माण झाला आहे. काही गुन्ह्यात तक्रारदारांनी स्वतः चोरटे पकडून दिले. त्यानंतर या पथकाने पुढील तपासच थांबवला. आता श्री स्वामी समर्थ मंदिरावर चोरट्यांनी डाका घातला.




























































