
श्रीराम मंदिरातील देणगी चोरी, पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण, नीट पेपरफुटी, परराष्ट्र धोरण, यासारख्या गंभीर मुद्दय़ांवरून काँग्रेसने मोदी सरकारची संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात कोंडी करण्याची तयारी केली आहे. तसेच मोदी सरकारकडून मांडण्यात येणाऱया सुधारणा विधेयकांना काँग्रेस कडाडून विरोध करणार आहे. तसेच महिला आरक्षणासंदर्भातील सुधारणा विधेयकाबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे.
मल्लिकार्जुन खरगे मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित विधेयकासंदर्भात पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी सरकारच्या सुधारित प्रस्तावांवर सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी केली आहे. खरगे यांनी म्हटले, की यासंदर्भातील दुरुस्ती विधेयक 17 एप्रिल रोजी फेटाळण्यात आले होते. हे विधेयक सरकार पुन्हा मांडणार असल्याचे समजते आहे. त्यामुळे यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलावून चर्चा करावी आणि विधेयकाचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा, अशी मागणी खरगे यांनी केली आहे.
दरम्यान, नवी दिल्ली येथे आज काँग्रेसच्या संसदीय मंडळाची काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी बैठक झाली. त्यात मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार पी. चिदंबरम, के. सी. वेणूगोपाल, शशि थरूर, जयराम रमेश इत्यादी नेते उपस्थित होते. या बैठकीसंदर्भात जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, काँग्रेस अनेक मुद्दे पावसाळी अधिवेशनात उपस्थित करणार आहे. श्रीराम मंदिराबाबत दररोज नवी माहिती उघड होत आहे. अयोध्येत भाजपने आणि आरएसएसने केलेला घोटाळा, ई-20 पेट्रोल घोटाळा यासारख अनेक मुद्दे आहेत, ज्यात भाजपचे अनेक वरिष्ठ नेते आणि त्यांचे पुत्र सामील आहेत. हे मुद्दे काँग्रेसकडून उपस्थित करण्यात येणार आहेत, असे रमेश म्हणाले.
या मुद्दय़ांनाही काँग्रेस विरोध करणार
जयराम रमेश यांनी सांगितले, की न्यायाधीशांना हटविण्याशी संबंधित सुधारणा विधेयकावरही बैठकीत चर्चा झाली. या विधेयकासंदर्भात ‘जेपीसी’ स्थापन करण्यात आली आहे. मात्र, विरोधी पक्षांनी त्यावर बहिष्कार टाकला असून काँग्रेस या विधेयकाचा तीव्र विरोधक करेल. तसेच ‘विदेशी अंशदान विनियमन अधिनियम’ यास आम्ही विरोध करू, असे जयराम रमेश म्हणाले.
































































