
पेपरफुटीमुळे सर्व देशात चर्चेत असलेल्या ‘नीट-यूजी’ परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यावर्षी 20 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 11.21 लाख विद्यार्थी वैद्यकीय, डेंटल, आयुष व इतर वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. पंजाबचा आर्यन गुप्ता आणि हरयाणाचा पांशुल बंसल यांनी 720 पैकी 715 गुण मिळवून संयुक्त प्रथम स्थान प्राप्त केले आहे.
यावर्षी ‘नीट-यूजी’ परीक्षा पेपर फुटल्यामुळे परीक्षा रद्द करून 21 जून रोजी फेरपरीक्षा घेण्यात आली. यावर्षी मुलींनी बाजी मारली असून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांपैकी 58 टक्के मुलींचा समावेश आहे. 19 उमेदवारांनी 700 पेक्षा जास्त तर 138 विद्यार्थ्यांनी 690 पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत. 705 पेक्षा जास्त गुण मिळविणारे विद्यार्थी महाराष्ट्र, पंजाब, हरयाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, तामीळनाडू आणि तेलंगणा या राज्यांमधील आहेत. या टॉप स्कोरर्सपैकी 93 टक्के विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच ही परीक्षा दिली होती तर, 99 टक्के टॉप स्कोरर्सचे वय 17 ते 19 वर्षांमध्ये होते. लवकरच पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या समुपदेशानाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. ही परीक्षा पुढील वर्षीपासून ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे.




























































