मुंबईत रंगणार ‘स्वर स्नेहल’ संगीत सोहळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध संगीतकार स्नेहल भाटकर यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत ‘स्वर स्नेहल’ हा विशेष संगीत सोहळा रंगणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित केलेला हा सोहळा 17 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिर येथे पार पडणार आहे.

स्नेहल भाटकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला आपल्या भावस्पर्शी आणि दर्जेदार संगीताने समृद्ध केले. ‘स्वर स्नेहल’ या कार्यक्रमातून त्यांच्या जीवनप्रवासातील महत्त्वाचे टप्पे, त्यांचे संगीत क्षेत्रातील योगदान आणि लोकप्रिय गीतांचा प्रवास उलगडला जाणार आहे. संगीत, निवेदन, नाटय़रूपांतर आणि उत्तम दृश्य मांडणी यातून रसिकांना त्यांच्या संगीत प्रवासाचा एक अविस्मरणीय अनुभव येणार आहे. कार्यक्रमाची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन ज्येष्ठ रंगकर्मी अशोक हांडे यांची आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशीष शेलार आणि सांस्पृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा आयोजित केला गेला आहे.

रसिकांना आवाहन

‘स्वर स्नेहल’ कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून संगीतप्रेमी, कलाकार, विद्यार्थी, संशोधक आणि रसिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहून या सुरेल सोहळय़ाचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्पृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.