कचऱ्याच्या कल्याणमध्ये ढिगाऱ्याजवळ पावाच्या लाद्या; संतप्त शिवसैनिकांनी केला भंडाफोड, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ चक्क पावाच्या लाद्या ठेवल्याचा संतापजनक प्रकार कल्याणच्या खडकपाडा परिसरातील केएफसी आउटलेटमध्ये समोर आला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या केएफसीच्या या किळसवाण्या कारभाराचा शिवसैनिकांनी भंडाफोड केला असून याबाबत तक्रार केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने या आउटलेटवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या आधारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हा संघटक प्रथमेश पुण्यार्थी यांनी दोन दिवसांपूर्वी ठाणे अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी संबंधित केएफसी आउटल `टची पाहणी केली. तपासणीदरम्यान केवळ कचऱ्याजवळ पावाचा साठा ठेवण्यात आल्याचे उघड झाले. तसेच अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण नऊ गंभीर त्रुटी आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.

… तर कठोर कारवाई करू

तपासात शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थांचे स्टोअरेज एकत्र ठेवले जात असल्याचे निदर्शनास आले. याशिवाय अन्न सुरक्षा व स्वच्छतेशी संबंधित अन्य अनेक बाबींमध्येही नियमांची पायमल्ली झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित व्यवस्थापनाला तातडीने सर्व त्रुटी दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून निर्धारित मुदतीत सुधारणा न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.