आशियाई 19 व 23 वर्षांखालील बॉक्सिंग स्पर्धा – हिंदुस्थानला दोन सुवर्णांसह तीन रौप्यपदके

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आशियाई १९ व २३ वर्षांखालील बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेतील पुरुष विभागात हंदुस्थानी मुष्टियोद्ध्यांनी दमदार कामगिरी करत नोहिमेची यशस्वी सांगता केली. २३ वर्षांखालील गटात हिंदुस्थानने दोन सुवर्ण आणि एक रौप्य, तर २९ वर्षांखालील गटात दोन रौप्यपदके पटकावत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ताकद पुन्हा एकदा सद्ध केली.

२३ वर्षांखालील गटातील अंतिम सामन्यांमध्ये हिंदुस्थानच्या विश्वनाथ सुरेश (५० किलो) याने जपानच्या दाइची इवाई याचा अत्यंत चुरशीच्या लढतीत ३-२ असा पराभव करून सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर गंगा (५५ किलो) यानेही कझाकस्तानच्या बेक्सुलातन बोरानबेक याला ३-२ अशाच फरकाने नमवत हिंदुस्थानच्या खात्यात दुसरे सुवर्ण जमा केले.

वंशज (६५ किलो) याने अंतिम फेरीत झुंजार लढत दिली. मात्र, उझबेकिस्तानच्या इलखोमजोन एर्गाशेव याच्याकडून १-४ अशा फरकाने पराभूत झाल्याने त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

१९ वर्षांखालील गटात हिंदुस्थानी बॉक्सरांनीही अंतिम फेरी गाठली. मात्र, सुवर्णपदक हुकले. आदित्य (५५ किलो) याचा उझबेकिस्तानच्या एल्योर रुस्तामोव याने ५-०, तर शुभम राजपूत (९० किलो) याचा असदबेक सुलतानबोएव यानेही ५-० अशा एकतर्फी फरकाने पराभव केला. त्यामुळे दोघांनाही रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

५ ते १६ जुलैदरम्यान जकार्ता येथे झालेल्या या आशियाई १९ वर्षांखालील आणि २३ वर्षांखालील बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत हिंदुस्थानच्या युवा मुष्टियोद्ध्यांनी विविध वजनगटांत उल्लेखनीय कामगिरी करत भविष्यासाठी आशादायी चित्र उभे केले. विशेषतः २३ वर्षांखालील गटातील दोन सुवर्णपदकांनी हिंदुस्थानी बॉक्सिंगची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली.