कल्याणमध्ये आईच्या कुशीत झोपलेल्या बाळाचे अपहरण; चोरांनी आईचा मोबाईलही पळवला, पोलिसांची चार पथके रवाना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मैत्रिणीला भेटण्यासाठी गुजरातवरून आलेल्या एका महिलेच्या कुशीतून बाळाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर घडली आहे. चोरटे एवढ्यावर थांबले नाही तर त्यांनी जाताना आईचा मोबाईलही पळवला. या घटनेने खळबळ उडाली असून चिमुरड्याला शोधण्यासाठी पोलिसांनी चार पथके रवाना केली आहेत.

रोशनी साहू (२१) ही महिला गुजरात राज्यातील दादरा नगर हवेली येथील सिल्वासा परिसरातील रहिवासी आहे. रोशनी आपल्या एका खास मैत्रिणीला भेटण्यासाठी कल्याणमध्ये आली होती. सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ती आपल्या सहा महिन्यांच्या बाळासह कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरील उड्डाणपुलाखाली थांबली होती. त्यानंतर मैत्रिणीचा फोन लागत नसल्याने ती त्याठिकाणी बसून होती. दरम्यान रोशनीला रात्री उशिरा झोप लागली. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी तिच्या कुशीत झोपलेल्या सहा महिन्यांच्या बाळाचे अपहरण केले. त्याचवेळी चोरट्यांनी तिचा मोबाईल फोनही चोरून पळवला आहे.

पायाखालची जमीन सरकली

पहाटे ३ वाजता जाग आल्यानंतर बाळ आणि मोबाईल दोन्हीही जागेवर नसल्याचे पाहून रोशनीच्या पायाखालची जमीनच जणू सरकली. बराच शोध घेऊनही बाळाचा ठावठिकाणा लागला नाही. नागरिकांच्या मदतीने रोशनीने महात्मा फुले चौक पोलीस ठाणे गाठले. आपल्यासोबत झालेला प्रकार तिने पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला.