बजरंग दलाच्या कार्यकत्यनि अश्लील व्हिडीओ पाठवून केला विवाहितेचा विनयभंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

२६ वर्षीय विवाहित युवतीला रात्री उशिरा मोबाईलवर अश्लील व्हिडीओ आणि आक्षेपार्ह संदेश पाठवून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी डोंबिवलीतील रामनगर पोलिसांनी ३५ वर्षीय करण उल्लेगल याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा बजरंग दलाचा कार्यकर्ता असून कल्याण विभाग संयोजक म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.

पीडित युवती डोंबिवली पूर्वेतील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. तिचे लग्न झाले असले तरी गेल्या चार महिन्यांपासून ती पतीपासून विभक्त राहात आहे. आरोपी करण उल्लेगल हा युवतीच्या काकाचा मित्र असून गेल्या सुमारे २० वर्षांपासून त्याची पीडितेच्या कुटुंबाशी ओळख आहे. तो ठाकुर्लीतील खंबाळपाडा परिसरात राहात आहे. चार महिन्यांपासून आरोपीने पीडितेशी वारंवार संपर्क साधत तिच्याशी संवाद वाढवला होता. बुधवारी मध्यरात्रीनंतर सुमारे पावणेदोनच्या सुमारास त्याने मोबाईलवर अश्लील व्हिडीओ पाठवल्याचा आरोप युवतीने केला आहे. त्यानंतर अश्लील स्वरूपाचे संदेश पाठवत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचेही तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.