
विद्यार्थी संघटना आणि लोकप्रतिनिधींकडून सातत्याने होणाऱ्या मागणीची दखल घेत राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा तूर्त ऑफलाइनच घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे हजारो परीक्षार्थी विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
एमपीएससीने परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याला सर्व स्तरांतून विरोध झाला. केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) आणि बहुतांश राज्य लोकसेवा आयोगांच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घेतल्या जातात. महाराष्ट्रातच ऑनलाइन परीक्षेचा आग्रह का, असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला होता. ऑनलाइन परीक्षांमध्ये तांत्रिक अडचणी आणि गैरप्रकारांची भीती अधिक असल्याने गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ शकतो; त्यामुळे पारंपरिक ऑफलाइन परीक्षाच अधिक पारदर्शक असतात, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासंदर्भात आज महत्त्वाची बैठक घेतली. एमपीएससीची संगणक आधारित ऑनलाइन परीक्षा पद्धत लगेचच लागू न करता, ती ऑगस्ट २०२७ पासून अंमलात आणण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.
अन्यथा काँग्रेसचे आंदोलन
एमपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाइन पद्धतीनेच घेण्याचा निर्णय जाहीर केला नाही तर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस नेते सतेज पाटील आणि पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे. एमपीएससी परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सीबीडी-बेलापूर मुख्यालयासमोर ८ ते १६ जुलै या कालावधीत सलग नऊ दिवस साखळी उपोषण व धरणे आंदोलन करण्यात आले होते.





























































