
साजापूर येथून एप्रिल महिन्यात बेपत्ता झालेल्या महिलेच्या खुनाचे गूढ अखेर चार महिन्यानंतर उकलले आहे. नात्यातील तरुणाने एका साथीदाराच्या मदतीने गळा आवळून खून करत महिलेचा मृतदेह सिन्नर वावी शिवारात, तर १४ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृतदेह पुणे परिसरातील नदीत फेकून दिला. या प्रकरणी अखेर आज गुरुवारी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
साजापूर येथील अब्दुल लतीफ युसूफ चौधरी हे मूळचे सिरसिया, (ता. इटावा, जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) येथील रहिवाशी आहेत. ते पत्नी रिजवाना, मुलगा शहबाज, अरबाज, नौशाद, राजाद व मुलगी समितीरा व अरीबा यांच्यासह राहतात. त्यांची मुलगी सायमा सलमान चौधरी (२६) हिचा विवाह २०२० मध्ये सलमान अब्दुल सलाम चौधरी यांच्याशी झाला आहे. तेव्हापासून ती पतीसोबत पुणे येथे राहत होती. तिचे पती वाहन चालवितात. त्यांच्या लहान मुलाचे निधन झाल्याने ते दीड वर्षापासून साजापूर येथे राहण्यासाठी आले होते. मात्र, काही दिवसानंतर जावई पुन्हा गाडीवर गेले होते. त्यामुळे त्यांची पत्नी सायमा व तिचा १४ महिन्याचा मुलगा राहत होते.
दरम्यान, १ एप्रिल रोजी तक्रारदार यांची मुलगी सायमा व नातू दोघे बाहेर गेले होते. त्यामुळे दोघे पुण्याला गेले असावे असा संशय त्यांना आला. त्यानंतर तब्बल दीड महिन्यानंतर जावयाला संपर्क साधला असता त्याने हे दोघे मायलेक माझ्याकडे आले नाहीत, असे सांगितले. त्यामुळे १९ मे रोजी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली होती. त्यानंतर घरात पहाणी केल्यानंतर तक्रारदार यांना मुलीच्या अॅक्सीस बँकेच्या खात्यावर ३ लाख रुपये जमा केल्याची पावती सापडली. तसेच ५० हजार रुपये फोनपे केल्याचे समोर आले. हे अकाऊंट त्यांचा भाचा नुरजामा अहमदअली चौधरी याचे असल्याचे समोर आले. त्यामुळे तक्रारदार यांनी मेहुणा अहमद अली चौधरी यांना कॉल करून ‘माझ्या मुलीने दिलेले पैसे परत दिले नाहीत. तसेच माझ्या मुलीला घेऊन कोठे गेला हे सांगा, नाहीतर पोलीस ठाण्यात तक्रार करतो…’ अशी धमकी दिली.
त्यानंतर त्याने धक्कादायक माहिती दिली. तक्रारदार यांचा भाचा हा पुण्याला घेऊन जाण्यासाठी तिला बोलवून घेतले. ब्रेझा गाडीत बसवून घेतल्यानंतर तिचा ओढणीने गळा आवळला. तिचा मृतदेह सिन्नर वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेकला, तर लहान मुलाचा मृतदेह पुणे रोडवरील नदी नाल्यात फेकून दिल्याचे सांगितले. ‘तुम्ही तक्रार करू नका’ मी पैसे परत करतो, असे सांगितले.
हा प्रकार समोर येताच तक्रारदार यांनी भाचा नुरजामा अहमद चौधरी व त्याचा मित्र सद्दाम ऊर्फ आमीर अहमद चौधरीविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी पुढील तपास एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत.

























































