
माजी आमदार तथा शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांच्या पत्नींसह उत्कर्षा कंपनीच्या 14 भागीदारांवर 50 लाख रुपयांचे बिल थकविल्याचा आणि धमक्या दिल्याचा आरोप करत गुलटेकडी येथील बांधकाम ठेकेदार खलील रज्जुलाल शेख (65) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओमध्ये तसेच सुसाईड नोटमध्ये उल्लेख केलेल्या रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीसह 14 जणांवर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खलील रज्जुलाल शेख (65, रा. गुलटेकडी)असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. ते बांधकाम कॉन्ट्रक्टर होते. रविवारी मध्यरात्री त्यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात शेख यांनी आत्महत्येपूर्वी मोबाईलवर व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचे तसेच सुसाईड नोट लिहिल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्या ताब्यात घेतल्या आहेत. व्हिडीओमध्ये शेख यांनी माजी आमदार तथा शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीसह, बाळा शेडगे यांच्या पत्नी, आहेर, शेख आणि रघु गौडा हे कंपनीचे भागीदार असल्याचा उल्लेख केला आहे. या कंपनीकडे आपल्या कामाचे 50 लाख रुपयांचे बिल थकले असल्याचा त्यांनी दावा केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून हे बिल न मिळाल्यामुळे स्वतŠला तीन टक्के व्याजाने कर्जाचे हप्ते आणि व्याज भरावे लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अनेकदा संबंधितांकडे पैशांची मागणी करूनही पैसे मिळाले नाहीत. उलट दादागिरी करण्यात आली, असा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी खलील यांच्या पत्नी सुल्ताना शेख (50) यांनी फिर्याद दिली आहे.



























































