
आरे स्टॉलधारकांचे विविध प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहेत. स्टॉलधारकांच्या विविध अडीअडचणींवर तोडगा काढण्यासाठी महापालिका सभागृह नेता दालनात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र दूध वितरक सेनेतर्फे आरे स्टॉलधारकांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या वेळी प्रशासनाकडून आयुक्तांसोबत संयुक्त सभा आयोजित करण्यासाठी पत्रव्यवहार करण्याच्या सूचना दिल्याने लवकरच आरे स्टॉल धारकांच्या सर्व समस्या सुटणार आहेत.
बैठकीदरम्यान गेली 25 वर्षे स्टॉलची दुरुस्ती करणाऱ्या आरे स्टॉलधारकांचे स्टॉल महापालिकेकडून निष्कासित करू नयेत,
स्टॉलधारकांना महापालिकेकडे थेट भुईभाडे भरण्याची परवानगी द्यावी आणि आरे स्टॉलवर दूध, दुग्धजन्य पदार्थ व आरे को-ब्रँडच्या वस्तू विकण्यासाठी कायदेशीर परवाना देण्यात यावा, अशा प्रमुख मागण्या महाराष्ट्र दूध वितरक सेनेतर्फे मांडण्यात आल्या. या बैठकीला सभागृह नेता गणेश खणकर, उपआयुक्त विनायक विसपुते, अनुज्ञापन अधीक्षक अनिल काटे, दुय्यम अभियंता प्रकाश म्हात्रे, रस्ते विभागाचे अभियंता नीलेश तोरस्कर यांच्यासह महाराष्ट्र दूध वितरक सेनेचे कार्याध्यक्ष राम कदम, सहकार्याध्यक्ष आदिनाथ हिरवे, उपाध्यक्ष तानाजी आरज व सुहास शिवडवकर, कोषाध्यक्ष विलास भुजबळ, सरचिटणीस सतीश सावंत तसेच सचिव अमित भुवड आणि रवींद्र पाष्टे आदी उपस्थित होते.
प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्टॉलधारकांनी चर्चा करून निर्णय घ्यावा आणि आयुक्तांना निवेदन देऊन संयुक्त सभा आयोजित करण्याबाबत पत्रव्यवहार करावा, अशा सूचना या वेळी उपआयुक्त विसपुते दूध वितरक सेना पदाधिकाऱयांना दिल्या. तसेच बेकायदेशीरपणे उभारलेले आरे स्टॉल किंवा स्टॉलवर बेकायदेशीर पदार्थांची विक्री केल्यास ते स्टॉल निष्कासित केले जातील. वाहतुकीस किंवा सर्वसामान्यांना अडथळा ठरणारे स्टॉल स्थलांतरित करण्यास परवानगी दिली जाईल, असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.



























































